खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर मंजूर…..
खेड – गेल्या तीन महिन्यांपासून खेड तालुक्यातील राजकारण चर्चेचा विषय ठरला आहे. खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला आहे. पर्यायाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादात खेड पंचायत समितीच्या सभापती पदाची सूत्रे भाजपच्या हाती गेली आहेत.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव अनिल देसाई यांनी पंचायत समिती सभापतींच्या ठरावाविरोधात आज मतदान करण्यासाठी सदस्यांना व्हीप बजावला होता मात्र पक्षाचा आदेश धुडकावून देत काही सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. पोखरकर यांनी सदस्यांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या कारणावरून ठरावाच्या बाजूने मतदान करण्यात आले असल्याचे मत शिवसेनेचे माजी सभापती तथा सदस्य अंकुश राक्षे यांनी मांडले आहे.
खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेचे सहा, भाजपचे उपसभापती तथा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार अशा 11 सदस्यांनी अविश्वास ठराव आणाला होता. तो 31 मे 2021 रोजी मंजूर करण्यात आला होता; त्यानंतर पोखरकर त्या निर्णयविरोधात न्यायालयात गेले तर इकडे हे सदस्य सहलीवर गेले होते. त्यावेळी त्यांच्य्यावर हल्ला केल्याने पोखरकर यांना अटक करण्यात आली असून ते अद्यापही अटकेत आहे. शिवसेना पक्षाने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप बजावत अविश्वास ठरावाविरोधात मतदान करण्याचे बजावले होते. मात्र आता शिवसेनेच्या काही सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या वादात मात्र उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्याकडे सभापती पदाची सूत्रे आली आहेत.
शिवसेनेच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले जरी असले तरी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता या सदस्यांवर काय कारवाई करणार आहेत. याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Add Comment