पुणे – शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे बैलगाडा शर्यत, आणि नेमकी तीच शर्यत अनेक वर्षांपासून बंद आहे. ही बंद शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रयत्न केले. आता त्यांच्या जागी डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले. आणि आता ही कामगिरी त्यांच्याकडे आली, अर्थातच माजी खासदार आढळराव पाटील देखील प्रयत्न करत आहेतच. मात्र गेल्या काही दिवसांपासून बैलगाडा मालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. परंतु इथे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन काहीच फायदा नाही त्यासाठी तांत्रिक बाबींची सोडवणूक करावी लागेल. हे सांगण्यात खासदार डॉ. कोल्हे ओझरच्या बैठकीत यशस्वी झाले.
मात्र बैलगाडा मालक आता हताश झालेले आहेत. माजी आणि आजी खासदारांकडे कळकळीची विनंती करत आहेत. ‘साहेब आम्ही आता पुरते थकलोय, आम्हाला कळत नाही काय करावं, साहेब तुम्हीच काही तरी करा आणि आमची बैलगाडा शर्यत सुरू करा, संसदे समोर बसून आंदोलन करू आम्ही लाखोंच्या संख्येने सहभागी होतो. आमच्याकडून जी मदत पाहिजे ती सांगा वेळप्रसंगी आम्ही आमच्या जमिनी विकू पण आमच्या दावणीची सर्जा – राजाची जोडी घाटात पळवा’. अशा प्रकारच्या याचना आता बैलगाडा मालक विध्यमान खासदारांकडे करत आहेत.
शनिवारी (दि. १४) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर येथे आमदार, विविध संघटनेचे पदाधिकारी, बैलगाडा मालक, वाजंत्री, बैलगाडा शौकीन, बैलगाडा शर्यतीशी निगडित असलेल्या मंडळींची अचानक बैठक घेतली. या बैठकीला माजी खासदार आढळराव पाटील यांनीही निमंत्रण दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक आमदारांना आणि माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनाही या बैठकीची कल्पना दिली. या बैठकीला आमदार अतुल बेनके, संजय जगताप, सुनील शेळके यांसह अनेक आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बैलगाडा मालकांनी आक्रमक होऊन आपली कैफियत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापुढे मांडली. येत्या पंधरा दिवसांत बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, खासदार कोल्हे यांना तर बैलगाडा मालकांनी पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला. आमदार सुनील शेळके यांनी तर बैलगाडा मालकांना पुणे – मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यासाठी निमंत्रणच दिले. आक्रमक झालेल्या बैलगाडा मालकांचं म्हणणं डॉ. कोल्हे यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं. आंदोलन करून काय होणार आहे. याउलट आणखी गुन्हे दाखल होतील. त्यापेक्षा आपण न्यायी मार्गाने जाऊ यावर कायमस्वरूपी तोडगा काढू आणि आपण नक्कीच ही लढाई जिंकू हा विश्वास डॉ. कोल्हे यांनी यावेळी बैलगाडा मालकांना दिला. तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील लढत आहेत.
दरम्यान या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत सुरू होण्यास कोणते अडथळे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला. बैलाचा समावेश संरक्षित यादीतून वगळून पुन्हा पाळीव प्राण्यांच्या यादीत समावेश करावा यासाठी माजी केंद्रीय पशु संवर्धन मंत्री गिरिराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात बदल झाला आणि त्यानंतर पुरुषोत्तम रुपाला केंद्रीय पशु संवर्धन मंत्री झाले त्यानंतर पुन्हा मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना भेटून पाठपुरावा केला एवढच काय तर, या दोन्ही आजी – माजी मंत्र्यांच्या या विषयावर एकमेकांशी चर्चा घडवून आणणार आहे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील यासंदर्भात भेट घेणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
दरम्यान आक्रमक झालेले बैलगाडा मालक शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केला असल्याचे दिसून आले.
(क्रमशः)
बैलगाडा शर्यत झालीच पाहिजे,नादच खुळा, समाजकारण, राजकारण एकाच झेंड्याखाली,लवकर सुरू करणार नसतील तर आझाद मैदानात शर्यत घेणेत यावी,माझीही जोडी घेऊन येईल..शेतकर्यांचा आनंद आणि गोवंश जतन होणेसाठी (गावठी,खिलार,म्हैसूर,जाती) बैलगाड्याशिवाय पर्याय नाही,झाली———-_