शिरुर | पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषद इमारतीचा उदघाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला. या भव्य इमारतीचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात राजकीय दृष्ट्या एक अनोखा प्रकार निदर्शनास आला आणि या प्रकाराची शिरुर तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अजित पवार हे भल्या पहाटे दिवसाची सुरुवात करतात आणि याचाच प्रत्यय शिरुरकरांनी देखील या कार्यक्रमात अनुभवला. या उदघाटन समारंभ प्रसंगी शिरुर तालुक्यातील मान्यवरांची भल्या पहाटे अजितदादांनी झोप मोडली खरी, परंतु कोरोनाच्या नियमांचे कारण पुढे करत आयोजकांनी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच लोकांना या कार्यक्रमात निमंत्रित केले होते. या कार्यक्रम ठिकाणी येण्यास नगरपरिषदेने ठराविक लोकांनाच पासेसची व्यवस्था केली होती. शिरुर तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाच पास मिळाले नसल्याने अनेकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळाला, तर काहींना माघारी परतावे लागले. त्याचबरोबर काही नेत्यांना निमंत्रण नसल्याचे देखील चित्र समोर आले आहे.
भल्या पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. परंतु पास नसल्याने निराशेपोटी माघारी परतावे लागले. यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी पाबळ येथील उपबाजार समितीच्या उदघाटन सोहळ्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गट तट न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळेच पाहायला मिळाले. शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक कार्यकर्त्यांना निमंत्रण आणि पासेस मिळाले नसल्याचे एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने The बातमीशी बोलताना सांगितले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार. डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, उपनगराध्यक्ष व सभागृह नेते प्रकाश धारिवाल,तसेच तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, ग्रा.पं. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे केवळ मोजक्याच तीनशे लोकांना पासची व्यवस्था केली होती – वैशाली वाखारे (नगराध्यक्षा – शिरूर नगरपरिषद)
छान वार्तांकन