लोणी – धामणी, पुणे – शेतीसाठी पाणी नाही, एवढंच काय तर प्यायला देखील पाणी मिळत नसल्याने लोणी, धामणी, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर, खडकवाडी, पहाडदरा, रानमळा- वाळूंजनगर या गावांची बैठक श्री म्हाळसकांत पाणी संघर्ष कृती समितीने ३ ऑक्टोबर रोजी लोणी येथे आयोजित केली आहे.
डिंभे धरण हे आंबेगाव तालुक्यात असून याच धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्यातील वरील गावांनाच मिळत नसल्याने या पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे समितीचे समन्वयक सागर जाधव यांनी सांगितले.
श्री म्हाळसकांत पाणी योजनेचे केवळ निवडणूकीच्या तोंडावरच आश्वासन दिले जाते. ही योजना अद्याप कुठेही शासन दरबारी मांडली नाही, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे गाजर दाखवले गेले आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला अथवा कोणत्याही नेत्यांना दोष न देता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाण्यापासून वंचित असलेल्या या गावांना पाणी कसं मिळेल याच्या संदर्भात चर्चा करून पुढील काळातील दिशा या बैठकीत ठरणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील ही गावं पाण्यापासून वंचित आहेत. अशाच प्रकारे या पूर्वी वळसे पाटील यांच्याच मतदार संघातीलच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावं आक्रमक झाली होती. केंदूर गावातून याची सुरुवात झाली होती, तशाच पध्द्तीने आता आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील ही गावं आक्रमक झालेली पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Add Comment