शिरूर, पुणे – दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरूरच्या भागातील पाबळ बाजार उपकेंद्राच्या उद्घाटनाचा २६ सप्टेंबर हा त्यांचा दुसरा दौरा तर २६ जून रोजी त्यांनी पहिल्या वेळी रांजणगाव परिसराचा दौरा केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पाबळच्या उद्घाटनानंतर केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटाचे राजकीय वातावरण ढवळले गेले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका अगदी काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाबळ आणि केंदूर या दोन्ही मोठ्या मतांच्या गावांना विचारात घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला गत्यंतर नाही. पाबळला लागोपाठ दोनवेळा अनुक्रमे नंदकुमार पिंगळे, सविता बागाटे यांना संधी दिल्याने केंदूरकर आता उमेदवारीचा दावा करत आहेत. गेले दहा वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या केंदूर – पाबळ गटात किती विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे.
केंदूरच्या माजी सरपंच राहिलेल्या तीन कुटुंबातील सदस्य तीव्र इच्छुक आहेत. माजी सरपंच विमल थिटे स्वतः तर मुलगा सनी थिटे इच्छुक आहे, माजी सरपंच आणि विध्यमान उपसभापती सविता पऱ्हाड स्वतः तर पती प्रमोद पऱ्हाड देखील इच्छुक आहेत, नुकताच सरपंच पदाचा राजीनामा दिलेल्या सुवर्णा थिटे, आणि पती सतीश थिटे हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
त्याचबरोबर केंदूर – पाबळ गटावर पक्षाच्या माध्यमातून वर्चस्व असलेल्या आणि राजकीय डावपेच टाकण्यात तरबेज असलेल्या बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी यापूर्वी अनेकदा ‘आमच्या पवार कुटुंबातून कोणीही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नसल्याचे’ कबूल केले असले तरी त्यांच्या नावाची पक्षाचे कार्यकर्तेच चर्चा करत आहेत. तर त्यांचेच मावसभाऊ पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाबळ उपबजार केंद्राच्या उद्घाटनानंतर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांच्या राजकीय कारकिर्दीतला आलेख पाहता, त्याचबरोबर बाजार समितीमध्ये सभापती पदावर असताना केलेल्या कामाचे मूल्यमापन लक्षात घेता, जांभळकर देखील उमेदवारीचा दावा करू शकतात. प्रकाश पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या जांभळकरांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा दस्तुरखुद्द प्रकाश पवारांनी देखील अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यामुळे या दिग्गजांच्या यादीत जांभळकरांचा देखील समवेश झाला आहे. त्याचबरोबर खैरेनगरचे माजी सरपंच एकनाथ खैरे देखील इच्छुक आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्यांनंतर या सर्व चर्चांना आता उधाण आले आहे. केंदूर – पाबळ गटात धामारी, पाबळ, खैरेवाडी, खैरेनगर, केंदूर या भागातील पाणी प्रश्न भविष्यातील निवडणूकीत चर्चिला जाणार हे मात्र नक्की. त्यामुळे आगामी काळात केंदूर – पाबळ गटात कोणकोणते राजकिय रंग पाहायला मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Add Comment