ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र राजकीय

झरे गावानंतर शिरूर तालुक्यातही होणार बैलगाडा शर्यती. ?

आमदार पडळकरांच्या जयेश शिंदेंना सूचना.

शिरूर, पुणे – महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात राज्य सरकारला गुंगारा देत बैलगाडा शर्यत भरवली. त्याच धर्तीवर आता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही बैलगाडा शर्यती भरवणार असल्याचे मत विठ्ठलवाडीचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच आणि पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

झरे गावात ज्याप्रमाणे बैलगाडा मालकांच्या सन्मानार्थ बैलगाडा शर्यत भरवली त्याप्रमाणे आता शिरूर तालुक्यातही बैलगाडा शर्यत भरवली जाणार आहे. आमदार पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीबाबत जसे आंदोलन उभे केले, तसेच आंदोलन शिरूर तालुक्यात देखील उभे करणार आहोत. आणि खुद्द आमदार गोपीचंद पडळकर यांनीच तशा सूचना दिल्या आहेत की, “जयेशराव तुमच्या तालुक्यात देखील बैलगाडा शर्यत भरवा मी स्वतः घाटात उभा राहील” त्यामुळे येत्या दहा – दिवसांत बैलगाडा शर्यतीबाबत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर शिरूर तालुक्यातही गनिमीकावा करून बैलगाडा शर्यती भरवल्या जाणार आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ, हवेली आणि संपूर्ण पुणे जिल्हा ही बैलगाडा शर्यतीची पंढरी आहे. त्यामुळे या भागातील बैलगाडा मालकांच्या भावना लक्षात घेऊन या भागात देखील आंदोलन सुरू करणार आहोत. जे गुन्हे दाखल व्हायचेत ते होऊद्या मात्र बैलगाडा शर्यती या होणारच असल्याचे देखील यावेळी शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात बैलगाडा शर्यती भरवणार असल्याचे सूतोवाच केले होते, तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिथं जिथं बैलगाडा मालकांवर खटले दाखल झाले आहेत ते मागे घेणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील ओझर येथे बैलगाडा मालकांची बैठक घेतली होती.
आता भाजपच्या वतीने शिरूर तालुक्यात बैलगाडा शर्यती होणार असल्याने त्या कधी होतात याकडे बैलगाडा मालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!