ताज्या घडामोडी शिरूर

बेघर कुटुंबाची आर्त किंकाळी कानी का पडली नाही.?

पिंपळे जगताप, पुणे | येथील कष्टकरी मजूरांच्या घरावर कोर्टाच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या उपस्थितीत हातोडा चालवला आणि तीस लहान लहान लेकरांसह वृद्ध नागरिकांना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर बेघर करण्यात आले. मात्र बेघर झालेल्या सोळा कुटुंबाची, कष्टकरी समाजाची आर्त किंकाळी अद्याप कोणालाही ऐकू आली नाही.

डोक्यावरील छप्पर ऐन हिवाळ्यात अन् दिवाळी सणाच्या तोंडावर भुईसपाट केल्यानंतर या नागरिकांना अन्न शिजवण्यासाठी देखील आडोसा उरला नसल्याने अनेक कुटुंबांची उपासमारीची वेळ आली आहे, रात्रीच्या वेळी डोंगराळ भाग असल्याने सर्प आणि इतर विषारी प्राणांच्या सानिध्यात विना विज वास्तव्य करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. आजारी बालके आणि वृद्ध नागरिकांचे या थंडीच्या दिवसांत हाल होत आहेत. पाच दिवस उलटूनही बेघर झालेल्या नागरिकांना कुठलीही मदत मिळाली नाही.

कोकणात भूस्खलन झालेल्या बेघर बांधवांना आणि पूरग्रस्त बांधवांना या भागातून मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यात आली, प्रत्येकाने खारीचा वाटा त्यावेळी उचलला आणि ट्रकच्या ट्रक पाठवण्यात आले परंतु आपल्या भागातील आणि जवळच असलेल्या बेघर कुटुंबांची आर्त किंकाळी कोणाच्याच कानावर का पडली नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.

धुणीभांडी करून, मोलमजुरी करून ही घरी उभी केली होती परंतु आता सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि संसार उघड्यावर आला आहे. घरात असलेला किराणा, कपडे, भांडी, धान्य, अनेक शाळकरी मुलांचे शालेय उपयोगी साहित्य, अंथरुण – पांघरूण हे सर्व आता नव्याने उभं करण्याची गरज आहे. त्यामुळे या नागरिकांना आपल्या मदतीची गरज आहे. ज्या प्रकारे कोकणात किंवा इतर भागात बेघर झालेल्या बांधवांना आपली मदत झाली तशीच मदत या बेघर कुटुंबांना देखील व्हावी असे आवाहन ‘The बातमी‘च्या माध्यमातून केले जात आहे…

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!