शिरूर, पुणे | पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत येत्या काही महिन्यात संपत आहे, त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना तशा सूचना काल (दि. 18) रोजी उशिरा पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. या मध्ये प्रभाग रचनेसाठी गेल्या निवडणुकीनंतर झालेले बदल त्याच बरोबर भौगोलिकदृष्ट्या झालेले बदल विचारात घेतले जाणार आहे. प्रभाग रचना तयार करून संपूर्ण कार्यवाही दि. 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे देखील निवडणूक आयोगाने पत्रात नमूद केले आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून अनेक अफवा पसरवल्या जात होत्या की, जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढ होणार, आरक्षणाबाबत देखील अनेक तर्क लावून सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, सदस्य संख्या वाढ बाबत 2011 ची लोकसंख्या विचारात घेण्यात येणार आहे. त्यामुळे आद्यप तरी सदस्य संख्या वाढ होणार नसल्याचेच चित्र समोर येत आहे.
आरक्षणाबाबत देखील न्यायालयाने २३ सप्टेंबर रोजी सुधारणा केली आहे. परंतु त्याला आवाहन देत मुंबई उच्च न्यायालयात आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नसल्याने प्रारूप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडत बाबतच्या सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत केवळ प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
Add Comment