आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

मानसिंगभैय्याला तिकीट द्या – कार्यकर्त्याचा सूर, पंचांचा निर्णय अंतिम राहील – प्रदीप वळसे पाटील.

क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडा…!

रांजणगाव, पुणे | शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांच्या संकल्पनेतुन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भव्य क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील मंचावर बोलत असताना, अचानक एका कार्यकर्त्याने प्रदिप वळसे पाटील यांना थांबवत “ओ दादा, आमच्या मानसिंगभैय्याला तिकीट द्या, आम्ही दिवसरात्र झटतोय, साहेबांसाठी देखील कष्ट घेतोय” अशी सूचना करत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मानसिंग पाचूंदकर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली.

परंतु प्रदीप वळसे पाटील यांनी अत्यंत शिथापीने “इथे पंच घेतील तो निर्णय अंतिम राहील तसच, आपले नेते जो निर्णय घेतील तो अंतिम राहील” असं म्हणत उमेदवारीचे सर्व अधिकार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आहेत असं सूचक विधान यावेळी केले, त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हास्याचे फवारे उडाले.

दरम्यान या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी उपस्थित असलेल्या सुभाष उमाप यांना उद्देशून, आपल्या केंदूर – पाबळ गटात देखील अशा स्पर्धा भरवा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी हवी असेल तर, असे गंमतीचे कार्यक्रम आयोजित करायला हवे, यासाठी मानसिंग पाचूंदकर आपल्याला मदत करतील असे म्हणाले. त्यावर तोच धागा पकडून प्रदीप वळसे पाटील यांनी “सविता बगाटे, सुभाष उमाप, प्रकाश पवार आपण एकत्र येऊन स्पर्धा भरवल्या तर बाहेरच्या कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही”. अशा शब्दांत केंदूर- पाबळ गटातील नेत्यांना कोपरखळी मारली.

दरम्यान या भव्य कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचूंदकर आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूंदकर यांची गैरहजेरीत मात्र प्रकर्षाने जाणवली. अद्याप येत्या जिल्हा परिषद निवडणूकीचे आरक्षण जाहीर झालेले नसताना मात्र रांजणगाव गणपती – कारेगाव गटात आता पक्षातच रस्सीखेच पहायला मिळत आहे. शेखर पाचूंदकर यांनी देखील दंड थोपटले आहेत. तर महिला आरक्षण आल्यास पुन्हा स्वाती पाचूंदकर मैदानात उतरतील अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर इकडे मानसिंग पाचूंदकर यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काळात पाचूंदकर कुटुंबातील रस्सीखेच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची यादी पाहता कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होणार यात शंका नाही.

error: Copying content is not allowed!!!