क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक अखेर निलंबित

शिरूर, पुणे | शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून आर्थिक अनियमितता, गैरकारभार, डोनेशन या कारणांमुळे चर्चेत आली होती. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करत सोमवारी जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्षांसामोर जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी दत्तात्रय वारे यांचे निलंबन केल्याची घोषणा केली. काल सोमवारी (दि. 22) रोजी जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी महिला सदस्यांनी वाबळेवाडी शाळेच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाबळेवाडी शाळेतील आर्थिक व प्रशासकीय अभिलेखांच्या चौकशीसाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे तो अहवाल विभागीय चौकशीसाठी सादर करण्यात आला असल्याचे सांगितले मात्र त्यावर महिला सदस्यांचे समाधान झाले नाही.

जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, सुनीता गावडे, सविता बगाटे, शिरूर पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे यांनी वाबळेवाडी शाळेतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेला नाही, मग ही गुणवत्ता कसली ? बाहेरील गावातील विध्यार्त्यांना डोनेशन घेऊन प्रवेश दिला जातो., जिल्हा परिषदेने बदली केलेल्या शिक्षिकेला रुजू करून घेतले जात नाही, यावर जिल्हा परिषद कारवाई करणार आहे की नाही असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर शाळेला मिळालेला दर्जा कमी करावा अन्यथा काही लोकांची मक्तेदारी होईल चौकशीत काय समोर आले आहे हे सभागृहात का सादर केले जात नाही? असा प्रश्न माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी मांडला तर उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती रणजित शिवतारे यांनी देखील मी सभापती असूनही मला अहवाल का दिला जात नाही, प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल आयुष प्रसाद यांना केला.

मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी कर्तव्य व अधिकाराचा गैरवापर करणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या चुकीच्या ठरावबाबत वरिष्ठ कार्यालयास कोणतीही माहिती सादर न करणे, शालेय कामकाजात निष्काळजीपणा करणे, शालेय व प्रशासकीय कामात अडथळा निर्माण होईल या दृष्टीने कृती करणे, शालेय अभिलेखात अनियमितता असणे, अशा प्रकारच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेषतः वारे यांनी चार बँकेत खाते उघडले आहे तसेच एका बँकेकडून कर्ज घेऊन १.५४ हेक्टर जमीनीचे क्षेत्र खरेदी प्रकरण देखील अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!