रांजणगाव, पुणे | रांजणगाव गणपती (ता. शिरूर) याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आंबेगाव मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या होत्या या स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी क्रिकेटप्रेमींसह पाचूंदकर समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी एवढी मोठी गर्दी पाहून पाचूंदकर यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचा जयजयकार करत मोठ्याने घोषणा द्यायला सांगितल्या त्यामुळे गृहमंत्री ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी घोषणांचा आवाज पोहचला पाहिजे अशी त्यांची भावना असावी याचं कारणही असच आहे. कारण आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.
दरम्यान याचाच धागा पकडून पुढे उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी आपल्या भाषणात या घोषणांच्या आवाजाचा आवर्जून उल्लेख करत “मानसिंगभैय्या तुमच्या घोषणांचा आवाज कधीच आंबेगाव नव्हे तर मुंबईत देखील पोहचला आहे आपण काळजी करण्याचं कारण नाही” अशी भावना व्यक्त करत एकप्रकारे पाचूंदकर यांच्या समाजकार्याचा आणि जनमताचा आलेख गृहमंत्री वळसे पाटील यांच्यापर्यंत पोहचला असल्याचे अप्रत्यक्ष सुचविले. त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी देखील गर्दीचा उल्लेख करत “ज्याने त्याच्याच गाडीला चावी लावा कारण इथे गड्यांची देखील एवढी गर्दी आहे की, आपली गाडी कोणती हे लवकर समजणार नाही” यावेळी उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले.
दरम्यान माजी सभापती प्रकाश पवार बोलत असताना त्यांनी देखील “समोरच्या तरुणांच्या मनात काय आहे ते ओळखून वळसे पाटील साहेबांच्या कानावर फोनद्वारे हे सर्व घातलेलं आहे, रांजणगाव- कारेगाव गटातील लोकांचे तुम्ही वाजतगाजत स्वागत केले, गटातील लोकं देखील आपला जल्लोष केल्या शिवाय राहणार नाही”. अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी विवेक वळसे पाटील यांनी मानसिंगभैय्या आपण या गटाचेच अध्यक्ष नाही तर संपूर्ण मतदार संघाचे अध्यक्ष आहात त्यामुळे भविष्यात संपूर्ण मतदार संघाची क्रिकेटची स्पर्धा भरवा अशी विनंती केली.
आपले नेते उद्या ज्याला बोट लावतील तो उमेदवार -पोपटराव गावडे
या कार्यक्रमात बोलत असताना माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मानसिंगभैय्या प्रीमियर लीगचे कौतुक केले. एवढी तरुणांची ताकद उभी असताना काळजी करण्याचं कारण नाही. आपण एका पक्षाचे आहोत बसून निर्णय घेऊ कुठलाही वाद होणार नाही. आपले नेते गृहमंत्री वळसे पाटील ज्याला बोट लावतील तो उमेदवार असेल असे सूचक विधान यावेळी गावडे यांनी केले. तर आमदार निलेश लंके यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावत तरुण सहकाऱ्यांच्या जोरावर मी आमदार झालो त्यामुळे मानसिंगभैय्या आपल्यामागे देखील तरुण सहकारी आहेत काळजी करण्याचं कारण नाही अशा भावना व्यक्त केल्या.
Add Comment