शिरूर, पुणे | सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या केंदूरकरांनी लोकसहभागातून चौदा किलोमीटर ओढा खोलीकरण आणि तलाव पुनर्जीवित करत तब्बल अंदाजे तीन कोटींहून अधिक रुपयांची जलसंधारणाची कामे पूर्ण केली. आणि या मिशनला ‘पाणीदार केंदूर’ नाव देऊन राज्याला आदर्श घालून दिला. त्याच पावलावर पाऊल ठेऊन कान्हूर मेसाईच्या (ता. शिरूर) युवकांनी देखील ‘पाणीदार कान्हूर’च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
‘पाणीदार केंदूर’ हे अभियान आद्यप संपलेले नाही, अजूनही साठ टक्के काम बाकी असताना केंदूरच्या पाणीपातळीमध्ये मोठा फरक झाल्याने परिसरातील गावं केंदुमध्ये झालेल्या कामांची पाहणी करून कौतुक करत आहेत. पंधरा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले केंदूर गाव २०१८च्या दुष्काळात होरपळून निघाले. आणि संकटात आलेल्या संधीची ओळख करून केंदूरचे सुपुत्र आणि पुणे आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीदार केंदूरच्या कामाला सुरुवात झाली. यशदा संस्थेचे सुमंत पांडे यांनी याकामी मोलाची कामगिरी बजावली आहे.
आता केंदूरच्या या पाणीदार केंदूर मिशनची चर्चा सर्वत्र झाली. २०१८ साली आलेल्या दुष्काळात एप्रिल २०१९ मध्ये शिरूर तालुक्यात केंदूर आणि कान्हूर या दोन गावांत चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. कान्हूरची देखील केंदूरसारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता केंदूर स्वावलंबी बनू लागले असल्याने कान्हूरच्या युवकांनी देखील ‘पाणीदार कान्हूर’ हे मिशन हाती घेतले आहे. यासाठी मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे यांसह अनेक युवक या मिशनमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे कान्हूरला देखील यशदा संस्थेचे सुमंत पांडे हेच मार्गदर्शन करत आहेत. शनिवारी (दि. २७) रोजी सायंकाळी ७ वाजता याबाबत छोटेखानी एक बैठक पार पडली या बैठकीत पाणीदार केंदूरच्या टीममधील युवराज साकोरे, भाऊसाहेब थिटे आणि भरत साकोरे यांनी कान्हूरच्या युवकांना मार्गदर्शन केले. सुमंत पांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक यशस्वी पार पडले यावेळी अनेक युवकांनी सहभाग नोंदवला.
आज रविवारी (दि. २८) रोजी पाणीदार कान्हूर या मिशनला सुरुवात करण्यासाठी पहिली शिवरफेरी देखील घेण्यात आली आहे. पाणीदार केंदूरच्या मिशनमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांचे सर्वांचे सहकार्य या कान्हूरच्या युवकांना देखील लाभणार आहे. दुष्काळी टिळा पुसण्याची युवकांची धडपड पाहून आता केंदूर प्रमाणे संपूर्ण गाव या पाणीदार कान्हूरमध्ये सहभागी होईल अशी अशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Add Comment