ताज्या घडामोडी राजकीय शिरूर संपादकीय

माजी सभापती जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार.?

पाबळ, पुणे | जिल्हा परिषद निवडणूक अगदी काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. केंदूर -पाबळ जिल्हा परिषद गटात देखील निवडणुकीपूर्वीचे वारे वाहू लागले आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी कोण मिळवणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नाकारणाऱ्या केंदूर -पाबळ गटात यापूर्वीच्या सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. शिरूर तालुक्यातील ३९ गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद या गटात वाढली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात या गटातील १० गावांचा समावेश आहे तर ४ गावं ही आमदार अशोक पवार यांच्या मतदार संघात येतात.

या गटातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांची ओळख आहे. तर याच गटात आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात स्वतः प्रकाश पवार उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र पवार यांचे मावसभाऊ आणि राष्ट्रवादीचेच शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे दोघेही जातेगाव बुद्रुक या गावात सरपंच म्हणून राहिले आहेत. या दोन्ही भावांनी गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत एकमेकांसमोर पॅनल उभे करून गावपातळीच्या राजकारणात देखील खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दोघेही राजकीय विरोधक असल्याची चर्चा सुरू झाली.

या दोघांमध्ये तिसरे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी देखील जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. बाजार समितीच्या सभापती काळात केलेल्या लोकाभिमुख कामांचा भविष्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फायदा होईल असं जांभळकर यांच्या बाबतीत बोलले जात आहे. या तीनही माजी सभापतींच्या बरोबरीने गटात दांडगा जनसंपर्क असलेल्या उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीसाठी अनुकूल असलेल्या केंदूर – पाबळ गटात शिवसेनेचे इच्छुक उमेदवार समोर येत नसले तरी भविष्यात शिवसेनेचाच जिल्हा परिषद सदस्य होणार असे शिवसैनिक छातीठोकपणे सांगायला विसरत नाहीत. आमच्याकडे इच्छुक उमेदवार भरपूर आहेत वेळ आल्यावर नक्कीच पक्षाच्या आदेशानुसार लवकरच मैदानात उतरतील. अशा प्रतिक्रिया सोपान जाधव, नितीन दरेकर, समाधान डोके, कांताराम नप्ते, अविनाश साकोरे, वैभव ढोकले यांनी व्यक्त केल्या आहे.

त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे आत्ताच केंदूर – पाबळ गटात वाहू लागले आहेत.

error: Copying content is not allowed!!!