रांजणगाव, पुणे | शिरूर तालुक्यातील रांजणगाव कारेगाव गटातच केवळ राजकीय वातावरण तापले आहे. या गटात वर्चस्व असलेल्या पाचूंदकर परिवाराकडून सामाजिक कार्यक्रमाच्या आडून राजकीय ताकद अजमावून दाखविली जात आहे. गेल्या आठवड्यात मानसिंग पाचूंदकर यांच्या माध्यमातून भव्य क्रिकेटच्या भरविण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली. आणि ती गर्दी पाहून उपस्थित राजकीय नेत्यांनी येणारी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तुफान फटकेबाजी करत राजकीय वातावरण आणखी तापवले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी शेखर पाचूंदकर यांनी धाकट्या भावाच्या म्हणजेच उद्योजक दत्तात्रय पाचूंदकर यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून कार्तिकी एकादशीनिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी रांजणगाव कारेगाव गटातील महिलांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरली. यावेळी उपस्थित नागरिकांचे आभार मानताना शेखर पाचूंदकर यांनी “आजपर्यंत घेतलेला वसा कधी टाकलेला नाही, कधी उतलेलो नाही कधी मातलेलो नाही, आणि इथून पुढे सुद्धा कधी हे व्रत टाकणार नाही” अशी ग्वाही दिली त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
दरम्यान क्रिकेटच्या मैदानात राजकीय फटकेबाजी करणाऱ्या नेत्यांनी मात्र या कार्यक्रमातील मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून शब्द आवरते घेतले. या कार्यक्रमात आयोजक किंवा कार्यकर्त्यांकडून मात्र कुठल्याही निवडणुकीचा अथवा उमेदवारीचा उल्लेख करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मात्र आवर्जून शेखर पाचूंदकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या नियोजनाचे त्याचबरोबर पाचूंदकर कुटुंबीयांच्या जडणघडणीमध्ये शेखर यांच्या योगदानाचे देखील कौतुक केले.
पाचूंदकर कुटुंबियांकडून आयोजित होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय हे मात्र नक्की. शिरूर तालुक्यातील इतर जिल्हा परिषद गटात मात्र निवडणुकीपूर्वीची शांतता पाहायला मिळते मात्र केवळ रांजणगाव कारेगाव गटात जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमातून सामान्य नागरिकांना मात्र याचा लाभ होत आहे. यातून पाचूंदकर कुटुंबियांच्या दातृत्वाचे दर्शन घडते. जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूंदकर यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आलेख देखील चढता आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाड्या, वस्त्यांवर पोहचलेला विकास कौतुकास्पद आहे. आणि याचाच फायदा येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचूंदकर परिवाराला मिळताना पाहायला मिळेल.
Add Comment