पाबळ, पुणे | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जरी असेल तरी शिवसेना पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघासाठी विजय पाटील यांची नव्याने संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाबळ येथे शिवसैनिकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसैनिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्याची मागणी केली.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने शिरूर आणि आंबेगाव भागात आता कंबर कसली आहे. या भागातील शिवसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे, शिवसेना पक्षाची ताकद या भागात आणखी वाढवायची असेल तर जयश्री पलांडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्याची गरज असल्याचे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. चासकमानच्या पाण्यासाठी संघर्ष करताना करंदी, जातेगाव खुर्द भागातील शेतकरी आणि शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, शिवसेनेचे सरकार असूनही ते अद्यापही माघारी घेण्यात आले नाही. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण ताकतीने उतरायचे असेल तर अनुभवी नेतृत्व असण्याची गरज असल्याच्या भावना देखील यावेळी शिवसैनिकांनी मांडल्या.
यावेळी सोपान जाधव, रवि गायकवाड, समाधान डोके, गणेश जामदार, दादा खर्डे, नितीन दरेकर, अविनाश साकोरे, संपत कापरे, वैभव ढोकले, महेश मासळकर, कांताराम नप्ते, स्वप्नील शेळके, प्रदीप थिटे, राघू नप्ते, रेवणनाथ गायकवाड यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
Add Comment