शिरूर, पुणे | पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील गायरान क्षेत्रात ग्रामपंचायत सदस्याच्या नातेवाईकने अतिक्रमण केल्याप्रकरणी आबासाहेब तांबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामपंचायत उपसरपंच कुणाल बेंडभर यांचे सदस्यपद अपात्र ठरविले आहे.
पिंपळे जगताप येथील सरकारी जागेवरील अतिक्रमण प्रकरण गेल्या पाच महिन्यापासून चर्चेत आले आहे. सुरुवातीला पिंपळे जगताप येथील गायरान क्षेत्रात चासकमान धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर तलाठी जयमंगल धुरंदर आणि ग्रामसेविका सारिका वाडेकर यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्यांचे निलंबन झाले. त्याचबरोबर सहा महिन्यांपूर्वी आबासाहेब तांबे यांनी ग्रामपंचायत उपसरपंच कुणाल बेंडभर यांच्या वडिलांनी सरकारी गायरान क्षेत्रात अतिक्रमण करून पक्के घर बांधल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत बेंडभर यांचे पद रिक्त करण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ६) रोजी ग्रामपंचायत उपसरपंच कुणाल बेंडभर यांचे सदस्यपद अपात्र ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान बेंडभर यांनी युक्तिवाद करताना वाडीलांपासून विभक्त राहत असल्याचे नमूद केले होते त्याचबरोबर अर्जदाराकडून राजकीय दृष्टया त्रास दिला जात असल्याचेही नमूद केले होते. पिंपळे जगताप येथील अतिक्रमण वेगवेगळ्या प्रकरणात आत्तापर्यंत एक तलाठी, एक ग्रामसेविका निलंबित तर एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपळे जगताप येथील अतिक्रमण प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
Add Comment