खेड ताज्या घडामोडी राजकीय

अशा कार्यक्रमांना लवकर येत जा, निवडणुका जवळ आल्यात गाडी सुटून जाईल…!

शेलपिंपळगाव | जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. अशातच विविध गावांत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. आज (शनिवारी) असाच एक चिंचोशी (ता. खेड) या गावातील सरपंच उज्वला सुरेश गोकुळे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी नव्यानेच नेमणूक झाली, म्हणून गावकऱ्यांनी नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष उज्वला गोकुळे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष आणि सिद्धेगव्हाण गावचे माजी सरपंच शशिकांत मोरे यांनी या कार्यक्रमाला उशिरा हजेरी लावली त्यामुळे आपल्या भाषणात सुरेश गोकुळे यांनी मोरे यांना “अध्यक्ष अशा कार्यक्रमांना वेळेत हजेरी लावत जा, निवडणुका जवळ आल्या आहेत गाडी सुटून जाईल” असा सल्ला दिला दरम्यान यावेळी उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. खेड पंचायत समितीच्या शेलपिंपळगाव गणातून शशिकांत मोरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तर इकडे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जाते त्यामुळे या दोघांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. दरम्यान मयूर मोहिते यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना अनेक उपस्थित मान्यवरांची नावे घेतली यावेळी “मात्र कोणाचं नाव घेण्याचं राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करत, कारण मी नवीन आहे लवकरच सर्व गोष्टी शिकून घेईल” असा उल्लेख मोहिते यांनी केला असता पुन्हा हास्यांचे फवारे उडाले.

दरम्यान या कार्यक्रमाला वैशाली गव्हाणे, विद्या मोहिते, संतोष गव्हाणे, सचिन भोसकर, सुभाष मोटे, मंगल शिंदे, सिमा गोकुळे, कविता गोकुळे, अमोल कानडे, अशोक ढोकले, माया निकम, युवराज भोसकर, दत्तात्रय दरगुडे, मंगेश गोकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!