ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

…अखेर केंदूर, पाबळला भारी पडले जातेगाव बुद्रुक.

पाबळ, पुणे | केंदूर – पाबळ जिल्हा परिषद करंडक या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी केले होते. यावेळी अंतिम फेरीत पाबळ आणि जातेगाव बुद्रुक या दोन संघात चुरस पाहायला मिळाली अन् शेवटी माजी सभापती सुभाष उमाप यांच्या मालकीचा संघ असलेल्या जातेगाव बुद्रुकने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी रविवारी (दि.१२) रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.

दरम्यान स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सोमवारी (दि. ६) रोजी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी त्यांच्या भाषणात त्यांचे जातेगाव बुद्रुक जरी लहान गाव असलं, तरी एका वर्षी तीन – तीन लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम भरविले होते, शिवाय मी व्यक्तिगत देखील एकदा गावात लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे मी मनात आणलं तर ते पूर्ण करू शकतो असे भाष्य केले होते. त्याला शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांनी दुजोरा दिला होता. उमाप यांचा जातेगाव बुद्रुकच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर या त्यांच्या भाष्याची उपस्थितांना पुन्हा आठवण झाली. बक्षीस वितरण प्रसंगी पुन्हा पाचूंदकर यांनी आपल्या भाषणात “पाबळ असुद्या किंवा केंदूर असुद्या नाही तर करंदी असुद्या जातेगाव असल्याशिवाय कोणाचं काही चालणार नाही” असा उल्लेख केल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले.

दरम्यान पाबळला हरवून जातेगाव बुद्रुकचा संघ जिंकल्यानंतर मात्र उमाप यांनी सावरून घेत “पाबळ काय अन् जातेगाव काय ही सगळी आपली माणसं आहेत, बगाटे ताई तुमच्या संघाला जरी हरवलं असेल तरी मी काहीच बोलणार नाही कारण भविष्यात आम्हाला पाबळची गरज आहे”. अशा मिश्किल भाषणाने कार्यक्रमाला आणखी रंगत आली. दरम्यान कुणाल खोंड आणि निलेश इंगवले या दोघांच्या कामगिरीचे कौतुक सर्वच मान्यवरांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, शेखर पाचूंदकर, सदाशिव पवार, केशरताई पवार, विश्वास कोहकडे, शंकर जांभळकर, प्रमोद पऱ्हाड, विकास गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!