शिरूर, पुणे | पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत १४ जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध झाल्या मात्र ७ जागांसाठी निवडणूक लागली होती. बहुतांश आमदार उमेदवार हे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेले परंतु शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. त्यांच्यासमोर पूर्वाश्रमीचे सहकारी आबासाहेब गव्हाणे यांनी आवाहन उभे केले होते, परंतु गव्हाणे यांचा आमदार अशोक पवार यांनी दारुण पराभव करून पुन्हा एकदा शिरूर तालुक्यात पवरांचीच चलती आहे दाखवून दिले आहे.
मावळते संचालक निवृत्ती गवारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात अशोक पवार यांना यश आले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आबासाहेब गव्हाणे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता आमदार पवार यांच्यासमोर आवाहन उभे करत भारतीय जनता पक्षाने देखील गव्हाणे यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी केली होती. माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे देखील गव्हाणेंच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते. या निवडणुकीत बाबुराव पाचर्णे यांचे खंदे समर्थक आबासाहेब सोनवणे यांनीही संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु शिरूरच्या ३९ गावातील मतदान मिळविण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मदतीने शिरूर तालुक्यातील १३१ मतदारांपैकी १०९ मतदारांनी आमदार पवार यांच्या पारड्यात आपली मते टाकली यासाठी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, शेखर पाचूंदकर, मानसिंग पाचूंदकर, शंकर जांभळकर, यांची यथोचित मदत घेऊन तालुक्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आमदार पवार यांनी माध्यमांशी बोलताना “पलीकडे आंबेगाव मतदार संघातील आमचे राष्ट्रवादीचेच मोठ्यांच्या गाडीत बसणारे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा राजरोसपणे प्रचार करत होते” असे वक्तव्य केले होते. परंतु यावेळी सर्वांना बरोबर घेऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित केले याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू आहे.
दरम्यान या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी सुजाता पवार, मानसिंग पाचूंदकर, राजेंद्र नरवडे, पंडित दरेकर, शंकर जांभळकर यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करत विजयश्री खेचून आणला. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहलीला नेलेल्या मतदारांना एकत्रित मतदान केंद्रावर घेऊन येत भाजपच्या गोटात खळबळ घडवून आणली होती. त्यामुळे एकंदरीत आमदार अशोक पवार यांचा विजय तिथेच निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Add Comment