शिरूर, पुणे | पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिरूर हवेली मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार प्रचंड बहुमतांनी निवडून आले आणि हाच आनंद कार्यकर्त्यांच्या गगनात मावला नाही, अन् कोरोनाच्या निर्बंधांना पायदळी तुडवून चक्क घोड्यावर मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सत्कार समारंभाची सभा देखील पार पडली. इकडे शरद पवार मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्यातील कोरोनाचा आढावा घेत आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच आमदार कोरोनाच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवून विजयाचा जल्लोष करत घोड्यावरून वरात काढत आहेत. उद्या हीच वरात कोरोनाच्या दारात घेऊन गेली तर नवल वाटायला नको.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याच आमदार अशोक पवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्णांची यथोचित सेवा केली. आमदारांच्या पत्नी आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या कोरोनाच्या काळातील चांगल्या कामाची दखल दस्तुरखुद्द शरद पवारांनी घेतली. भर सभेत कौतुकही केलं मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती उद्भवली असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या आनंदामुळे आमदारांच्या कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. आणि सणसवाडी (ता. शिरूर) येथे आमदारांची चक्क घोड्यावरून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात जल्लोष केला. एवढच काय तर मोठ्या दिमाखात सत्कार समारंभही संपन्न झाला यावेळी तालुक्यातील प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना देत आहेत. स्वतः शरद पवार देखील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शिवाय आता राजकीय सभा आणि मिरवणुका घेऊ नये असं स्पष्ट सांगितले असतानाही हा प्रकार सणसवाडीत घडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या कार्यक्रमाबाबत टिप्पणी केली. असं असताना पवार दाम्पत्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव ओतून काम केले आहे मात्र आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम झाला असला तरी आमदार हा कार्यक्रम टाळू शकले असते. त्यामुळे वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे कितपत योग्य असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Add Comment