‘डॉ.अब्दुल कलाम यंग रिसर्च फेलोशिप’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
पुणे (दि.16 जाणे): ‘तेर पोलिसी सेंटर’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.ए.पी.जे.कलाम यंग रिसर्च फेलोशिप’साठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ही मुदत अजून पंधरा दिवस वाढविण्यात आल्याने इच्छुकांना येत्या ३१ जानेवारी पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे,अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी दिली.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी व युवकांच्या कल्पकतेला वाव देत तरुण,नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘डॉ.ए.पी.जे. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’सुरु करण्यात आली असून यंदा शिष्यवृत्तीचे ५ वे वर्ष आहे.यातील सर्वोत्कृष्ट ५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये २५ हजार व प्रमाणपत्र अशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.शिष्यवृत्तीविषयी अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी http://www.drkalamfellowship.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे .
यासाठी डॉ. कलाम यांच्या जयंतीदिनापासून (१६ ऑक्टोबर) तीन महिने अर्ज करण्याची मुदत असते. जानेवारी १५ पर्यंत असणाऱ्या या मुदतीत अजून वाढ करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी वयवर्ष १८ ते २५ या वयोगटातील युवक अर्ज भरू शकतात. आजवर ५०० अर्ज संस्थेकडे आले आहेत. मुदत वाढ मिळाल्याने या संख्येत अधिक भर पडून अधिकाधिक युवकांना याचा लाभ घेता येईल अशी भावना डॉ. आपटे यांनी व्यक्त केली आहे.
याविषयी आपटे म्हणाल्या, “डॉ. कलाम हे देशातील प्रत्येकाचेच लाडके व्यक्तिमत्व आहेत यात काही शंकाच नाही. नवोदित संशोधक, महाविद्यालयीन तरुण यांना नवीन काही करून पाहण्याची उर्मी असते मात्र आर्थिक पाठबळ नसते. अशा संशोधन क्षेत्राला आश्वासक ठरणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून मदत करण्यासाठी या शिष्यवृत्तीची आम्ही सुरुवात केली आहे. डॉ. कलाम यांच्या नावाच्या या शिष्यवृत्तीने त्यांना प्रेरणा मिळावी हाच त्यामागील उद्देश आहे.”
या अर्जांची छाननी करून एप्रिल महिन्यात सादरीकरण, मे मध्ये परीक्षकांसह परिपूर्ण अर्जदारांच्या मुलाखती व जून मध्ये याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भारतातील नवी दिल्ली येथील अमेरिकेच्या दूतावासात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्यविषयक माजी समुपदेशक डॉ. सतीश कुलकर्णी, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम निवृत्त अधिकारी अनिल अरोरा व सुनिल शास्त्री (FRGD FRSA Director, Ocean Governance Limited, United Kingdom) हे परीक्षक आहेत.
Add Comment