खेड, पुणे | शिरूर लोकसभा मतदार संघ हा बैलगाडा शर्यतीच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून अवलंबून असलेला पाहायला मिळतो. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याच राजकारणावर गेल्या तीनही लोकसभा निवडणुका जिंकून इतिहास घडविला. मात्र तोच इतिहास डॉ. अमोल कोल्हे यांनी मोडीत काढला. शिरूर लोकसभा मतदार संघावर डॉ. कोल्हेंच्या रूपाने राष्ट्रवादीला खासदार मिळाला. याच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. कोल्हे यांनी मतदारांना आश्वासन दिले होते की, “ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी म्होरं घोडी धरणार म्हणजे धरणार”. त्यानिमित्ताने आज (१६ फेब्रुवारी) निमगाव दावडी येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा घाटात खासदार डॉ. कोल्हे घोडी धरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पहिली अधिकृत बैलगाडा शर्यत लांडेवाडीत भरवली असली तरी निमगाव दावडी येथील यात्रेला पारंपरिक इतिहास आहे. शिवाय बैलगाडा शर्यतीचा उगमस्थान म्हणून देखील निमगाव दावडी येथील खंडोबा यात्रेच्या बैलगाडा घाटाची ओळख आहे. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे आज निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेला शब्द निमगाव दावडी येथील बैलगाडा घाटात पूर्ण करणार असल्याचे बोलले जात आहे.
खासदार डॉ. कोल्हे निमगावच्या घाटात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक, राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निमगाव दावडी येथील घाटात गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण बैलगाडा प्रेमींचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे लक्ष लागून आहे.
Add Comment