पाबळ, पुणे | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (दि. १६) रोजी निमगाव दावडी येथील घाटात बैलगाड्या पुढे घोडी धरली आणि याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. दरम्यान गुरुवारी पुन्हा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाबळच्या घाटात बैलगाडा मालकांची भेट घेतली. यावेळी काही बैलगाडा मालकांनी पुन्हा घोडीवर बसण्याचा आग्रह केला त्यावेळी आता पुन्हा घोडीवर बसणार मात्र त्याचा मुहूर्त अजून ठरला नाही. जेव्हा बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळला जाईल तेव्हाच पुन्हा बैलगाडा घाटात बारी पुढे घोडी धरणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पहिल्या बारी पुढे घोडी धरणार असल्याचे आश्वासन दिले होते. ही वचनपूर्ती करण्यासाठी बुधवारी निमगाव दावडी येथील खंडोबा यात्रेतील मानाच्या बैलगाडा शर्यतीमध्ये घोडीवर स्वार होऊन दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे सांगितले. मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावर ही घोडी नव्हती तर खोगीर होते शिवाय आर्धी यात्रा उरकल्यावर ते घोडीवर बसले आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. अशा प्रकारे खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर टीका केली. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी इनामाच्या घाटात घोडी धरण्यापेक्षा मानाच्या घाटात घोडी धरलेली केंव्हाही चांगली असे प्रतिउत्तर दिले होते.
दरम्यान पाबळच्या घाटात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकिनांनी गर्दी केली होती. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घाटात युवकांनी खांद्यावर उचलून घेत बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने जल्लोष साजरा केला. यावेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल पाहायला मिळाला
Add Comment