मुलाला राजकारणात न आणण्याचा पावरांना धारीवालांचा सल्ला
शिरूर, पुणे | शिरूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या नवीन व्यापारी इमारतीचे उद्घाटन नुकतेच आमदार अशोक पवार व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहात नेते उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. उद्घाटन प्रसंगी धारिवाल बोलताना आमदार पवारांचे कौतुक करत होते की, उणिवा दाखवून देत होते तेच उपस्थितांना लवकर उमगले नाही. आमदार अशोक पवारांचे अर्धे काम तर सुजाताभाभी पवारच करतात, त्याचबरोबर अशोकबाप्पू बोलायला हुशार आहेत, बोलायला स्पष्ट आहे, तुम्ही त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका पण तितकाच खुन्नशी माणूस आहे, मी खरं तेच सांगतो आमचे कौटुंबिक संबंध आहे म्हणून मी बोलतो. कौटुंबिक आम्ही सोबत असलो तरी राजकारणात मी त्यांच्या सोबत नाही, तसा तर मी राजकारणातच नाही. अशाही भावना उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी बोलताना व्यक्त केल्या.
दरम्यान आमच्या तिसऱ्या पिढीचे देखील कौटुंबिक संबंध चांगले आहेत, मात्र अशोकबाप्पू आणि भाभी तुम्हाला एकच मुलगा आहे तुमचं दोघांचं चालुद्या पण त्याला तुम्ही राजकारणात आणू नका, त्याला आमच्यासारखं व्यावसायिक बनवा, दोन – तीन मुलगे असते तर ठीक आहे. एक राजकारणात, एक समाजकारणात परंतु तुम्हाला एकच मुलगा आहे तुम्ही त्याला राजकारणात आणू नका. मलाही एकच मुलगा आहे त्यालाही मी राजकारणात जाऊ देणार नाही आणि मी देखील राजकारणात नाही. यावेळी मुलाला राजकारणात न आणण्याचा सल्ला देखील आमदार अशोक पवार यांना प्रकाश धारिवाल यांनी आवर्जून दिला. मात्र यावर पवार यांनी बोलण्याचे कटाक्षाने टाळले.
त्याचबरोबर आमदार पवार यांच्या कामाचे कौतुक करताना धारिवाल म्हणाले की, आमचं जेवढं आयुष्य आहे तेवढे दिवस बाप्पू काही आमदार पदावरून हलणार नाही त्यांचं काम खूप मोठं आहे. सकाळी सात पासून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाला उपस्थितीत राहतात, खरेदीविक्री सहकारी संस्था नफ्यात आहे याचं श्रेय देखील आमदार पावरांनाच जातं असंच चांगलं काम करत रहा. असा सल्ला देखील धारिवाल यांनी आमदार पवार यांना दिला. या कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे देखील उपस्थित होते
Add Comment