राजकीय शिरूर

सोशल मीडियावर पोलिस महाशय करतात भाजपची बदनामी, निलंबनाची मागणी…!

शिक्रापूर, पुणे | कोविडच्या काळात जीवावर उदार होऊन पोलिसांनी एकीकडे जनतेची सेवा केली त्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांचे कौतुक आपण पाहिले असेलच मात्र कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करत एका पोलिस महाशयांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत भारतीय जनता पक्षाची बदनामी होईल अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या पाबळ दुरक्षेत्रात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढेकणे या महाशयांनी नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आक्षेपार्ह आणि खोटी आकडेवारी टाकून संदेश प्रसारित केले. त्याचबरोबर हे संदेश पुढे पाठविण्याचे आवाहन देखील केले. अशा प्रकारचे भाजपला बदनाम करण्यासाठी सातत्याने संदेश यापूर्वी देखील अनेक वेळा पाठवले असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदन देत ढेकणे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान शेळके, राजेंद्र ढमढेरे, संतोष करपे, पंडित भुजबळ, अरुण भुजबळ, रोहित खैरे, नवनाथ भुजबळ, सुरज चव्हाण, भाग्यश्री गायकवाड, अनिल नवले, वैभव गवारे, विशाल इंगळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!