राजकीय शिरूर

राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल मतदारांनी नाकारला; फराटे जोडगोळीचा राष्ट्रवादीला दणका…!

शिरूर, पुणे | सहकारी संस्थेची निवडणूक म्हंटलं की राष्ट्रवादीचा विजय बहुतांश वेळा ठरलेला असतो, सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो. मात्र याच समीकरणाला छेद देण्याचं काम शिरूर तालुक्यातील दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे या जोडगोळीने केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात प्रतिष्ठित समजली जाणारी मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत तिहेरी लढत झाली. यामध्ये १३ पैकी ११ उमेदवार फराटे जोडगोळीने निवडून आणले तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.

मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत कमालीची रंगत पाहायला मिळाली तालुक्यातील अनेक गावांत सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या मात्र मांडवगण फराटा गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत तेरा जागेसाठी थेट तीन पॅनलचे ३९ उमेदवार रिंगणात उतरले होते. पैकी दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांच्या शिवशक्ती सहकार विकास पॅनलच्या ११ उमेदवारांनी विजय मिळवला आणि वाघेश्वर सहकार आघाडी पॅनेलच्या २ उमेदवारांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादी पुरस्कृत असलेल्या सहकार प्रगती पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

दादा पाटील फराटे हे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईसचेअरमन तर सुधीर फराटे विध्यमान संचालक आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईसचेअरमन आणि विद्यमान संचालक बाबासाहेब फराटे हे राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार होते त्यांचा देखील पराभव झाला असून दत्तात्रय फराटे, शंकरराव फराटे, बाळासाहेब माणिक फराटे, आत्माराम फराटे या कारखान्याच्या माजी संचालकांना देखील आपला पराभव पत्करावा लागला आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर आमदार अशोक पवार यांचे वर्चस्व आहे, मात्र सातत्याने पवार यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेऊन विरोध करणारे दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांनी आगामी कारखान्याच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कारखान्याच्या निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून या सोसायटीची निवडणूक पार पडली असल्याचे बोलले जाते. मात्र घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर आमदार अशोक पवार यांची एकहाती असलेली सत्ता काढून घेण्यात फराटे जोडगोळी किती यशस्वी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!