पाबळ, पुणे | विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील अनेक गावांत राजकारण तापले आहे. सोसायटीच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पाबळ सोसायटीत देखील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या वतीने महाविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी केले तर पाबळचे माजी सरपंच शिवसेनेच्या सोपान जाधव यांनी महाविकास आघाडी पॅनलचे नेतृत्व केले होते. यात बगाटेंच्या पॅनलने १३ पैकी १० जागा जिंकून सोसायटीवर सत्ता प्रस्थापित केली आहे.
पाबळच्या राजकारणात नेहमीच शिवसेनेच्या सोपान जाधव यांचे वर्चस्व पहायला मिळत होते. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील गावच्याच उमेदवार असलेल्या सविता बगाटे यांना अपेक्षित मतांचा आकडा गाठता आला नव्हता, त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील सोपान जाधव यांच्या पॅनलने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे बगाटे यांच्या मनात पाबळच्या मतदारांना आपलेसे करता येत नसल्याची सल होती. म्हणून सोसायटीच्या निवडणुकीत बगाटे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून १३ उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली होती, घरोघरी जाऊन मतदारांना संपूर्ण पॅनल निवडून देण्याचे आवाहन केले होते त्याच पार्श्वभूमी राष्ट्रवादीच्या १३ पैकी १० उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पर्यायाने अनेक वर्षे पाबळच्या राजकारणात राष्ट्रवादीची होणारी पिछेहाट सविता बगाटे यांनी सोसायटीच्या निवडणुकीत पुसून टाकली आहे.
दरम्यान सोसायटीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर दोनही बाजूच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपापल्या परीने प्रचार केला होता. विजयानंतर जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी ‘The बातमी’शी बोलताना सांगितले की, ही निवडणूक आम्हीच जिंकणार याची सर्वच उमेदवारांना खात्री होती, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अपयश आले याचे शल्य मनात होते. शिवाय गेल्या पंचवार्षिक सोसायटीच्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. राष्ट्रवादी हा आमचा परिवार आहे सर्वच कार्यकर्त्यांनी मन लावून प्रचार केला, वरिष्ठ नेत्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले यामध्ये प्रकाश पवार, मानसिंग पाचूंदकर, प्रदीप वळसे पाटील, सदाशिव पवार यांच्यासह सर्वांनीच आम्हाला बळ दिले त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने हा विजय मिळवला आहे. यामध्ये शांताराम चौधरी, विकास बगाटे, अरुण चौधरी, किशोर रत्नपारखी, संजय चौधरी, रवींद्र चौधरी, बाळासाहेब नऱ्हे, अंकुश गव्हाणे काळूराम बगाटे, पांडुरंग लोखंडे, अण्णा पानसरे, राजू आगरकर, बाळासाहेब वरखडे यांनी पॅनलची जबाबदारी घेतली होती अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.
विजयी उमेदवार
राष्ट्रवादी – गुरुनाथ नऱ्हे, विजय पानसरे, गणपत गव्हाणे, सतीश वाबळे, विक्रम चौधरी, पांडुरंग चव्हाण, गणेश गायकवाड, संगीता सातव, आत्माराम पिंगळे, प्रकाश चौधरी
महाविकास आघाडी – गणेश नऱ्हे, संभाजी चौधरी, रोहिणी जाधव
Add Comment