शिरूर, पुणे | राजकारण आणि भ्रष्टाचार यावर आधारित नायक चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो आणि भ्रष्टाचार निर्मुलन करण्याचे कार्य हाती घेतो, असं दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. परंतु शिरूर तालुक्यात एका गावच्या उपसरपंच पदाची कहाणी जरा वेगळीच आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) हे गाव नेहमीच शासकीय आणि राजकीय डावपेचात चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी हेच गाव अतिक्रमण प्रकरणावरून राज्यात गाजले होते. आता पुन्हा राज्यात चर्चिला जाईल असा प्रसंग घडला आहे. त्याचं झालं असं की, वडिलांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले म्हणून मुलाचे म्हणजेच कुणाल बेंडभर यांचे जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र ठरविले होते. बेंडभर हे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर कार्यरत होते. त्यामुळे ग्रामपंचायत उपसरपंच पद रिक्त झाले असे मानून ग्रामसेवक शंकर भाकरे आणि सरपंच सोनल नाईकनवरे यांनी सोमवारी (दि. २८) रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेतली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य शुभांगी स्वप्नील शेळके यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी बिनविरोध उपसरपंच म्हणून शुभांगी शेळके यांची निवड झाल्याचे घोषित केले.
दरम्यान कुणाल बेंडभर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते. उपसरपंच पदाची निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. २९) रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अर्थातच कुणाल बेंडभर यांच्या ग्रामपंचायत सदस्य पदाला दिलासा मिळाला.
त्यामुळे बेंडभर यांच्या ग्रामपंचायत सदस्य पदाची बाब न्यायप्रविष्ट असतानाही सरपंच सोनल नाईकनवरे आणि ग्रामसेवक शंकर भाकरे यांनी संगनमत करून घाईगडबडीने सरपंचाच्या स्वार्थासाठी उपसरपंच पदाची निवडणूक घेतली आहे. ही निवडणूक बेकायदेशीर आहे, माझ्या संविधानिक अधिकारावर गदा आणली असल्याने सरपंच नाईकनवरे आणि ग्रामसेवक भाकरे यांच्या विरोधात वरिष्ठ न्यायव्यवस्थेकडे दाद मागणार असून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे बेंडभर यांनी The बातमी‘शी बोलताना सांगितले.
दरम्यान ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप यांनी देखील उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मासिक सभेची परवानगी घेतली नसल्याचे कारण देत सरपंच, ग्रामसेवक यांना अर्ज करून, होऊ घातलेली उपसरपंच पदाची निवडणूक घेऊ नये असे नमूद केले होते. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप आणि कुणाल बेंडभर यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली असल्याने या दोघांच्याही अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Add Comment