शिरूर, पुणे | महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने शिरूर कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिरूर मल्लसम्राट २०२२ च्या स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धांचे आयोजन रांजणगाव गणपती येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचूंदकर यांनी केले आहे. या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. आज शिरूरचा १९ वा मल्लसम्राट कोण होणार याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले असल्याची माहिती पाचूंदकर यांनी दिली.
गेल्या वीस वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिरूर मल्लसम्राट’ या स्पर्धा सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील विविध गावांत या स्पर्धांचे दर वर्षी आयोजन केले जात आहे, यावर्षी रांजणगाव गणपती या गावाला हा बहुमान मिळाला असल्याने जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूंदकर आणि दत्तात्रय पाचूंदकर यांच्या माध्यमातून शेखर पाचूंदकर यांनी या स्पर्धांचे आयोजन केले आहे. पुरुषांसह महिलांना देखील या स्पर्धेत संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, तीन दुचाकीसह रोख रक्कम आणि मानाची गदा या स्पर्धेसाठी असणार आहे. अशी माहिती शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झेंडू पवार सर यांनी दिली.
आजच्या या अंतिम कुस्तीचा थरार पाहण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री सचिन अहिर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, निलेश लंके, यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यामुळे यावर्षीचा ‘शिरूर मल्लसम्राट’ अर्थात ‘शिरूर केसरी’ कोण ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
Add Comment