मंचर, पुणे | शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी १५ वर्षे पूर्वी खेड आणि नंतर शिरूर लोकसभा मतदार संघाचे संसदेत नेतृत्व केले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे खासदार म्हणून या भागाचे ते नेतृत्व करत आहेत. शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांना मिळवून दिलेली खासदारकी डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घालून ती खासदारकी खेचून आणली, त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासह शिवसैनिकांना देखील नैराश्य आले. त्यामुळे या भागातील शिवसैनिकांचे नैराश्य दूर करण्यासाठी थेट शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या खेट्या वाढल्या आहेत. दरम्यान या भागातील शिवसेनेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि. ६) रोजी आढळराव पाटील हे पुढच्या वेळी संसदेत असतील असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, संसदेत जाण्यासाठी खूप दरवाजे आहेत. या नाही तर त्या दरवाजातून आढळराव पाटील संसदेत जातील. म्हणजेच भविष्यात शिवसेनेकडून राज्यसभेवर देखील आढळराव पाटील खासदार होऊ शकतात असे संकेत यावेळी राऊत यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी वर राज्यात आहे, स्थानिक पातळीवर आघाडी कशाला पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी आपली ताकद दाखवली पाहिजे. यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळे लढण्याचे संकेत देखील संजय राऊत यांनी दिले आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीला आघाडी होणार आणि आम्ही स्थानिक पातळीवर निवडणुका लढायची वेळ आली तर स्वबळावर लढायचं असा सवाल शिवसैनिक आता उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर आढळराव पाटील यांनी देखील बोलताना सांगितले इथून मागे तुम्ही आमच्यासाठी निवडणुकांना सामोरे जात होतात आता तुमच्यासाठी लढाई करायची आहे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्हाला विजयी व्हायचं आहे. दरम्यान तक्रारींचा पाढा घेऊन गेलेल्या शिवसैनिकांना शांत करण्यात संजय राऊत यांना यश आल्याचे यावेळी निदर्शनास आले.
Add Comment