मंचर, पुणे | शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांवर आणि शिवसैनिकांवर चासकमानचे पाणी मिळवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना यापूर्वी देखील शिवसैनिकांनी भेटून याबाबत कल्पना दिली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी सर्व प्रकरण समजून घेत शिक्रापूर येथील भर सभेत गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
दोन वर्षांपूर्वी करंदी, जातेगाव खुर्द, शिक्रापूर, पिंपळे, जगताप, वाजेवाडी, सणसवाडी, कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील काही शेतकऱ्यांनी मिळून चासकमान धरणाचे पाणी या गावांतील शेतकऱ्यांना देखील नियमानुसार मिळावे यासाठी संघर्ष सुरू केला होता. सुरुवातीला अगदी थोड्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर वरील सर्व गावांतून शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. यामध्ये समाधान डोके यांनी या आंदोलनाचे प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे समाधान डोके, नितीन दरेकर, अविनाश देवकर, राजाराम केवटे यांच्यासह ६५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान हे गुन्हे चुकीच्या व अन्यायकारक पध्द्तीने आमच्यावर दाखल करण्यात आले आहेत. आमच्या हक्कासाठी आम्ही संघर्ष करत होतो मात्र स्थानिक राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी पोलिस प्रशासनाचा वापर करून पोलिसांना गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आता शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा पुन्हा दरवाजा ठोठावला आहे.
यावेळी संजय राऊत यांची पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव यांनी देखील भेट घेऊन मोठे नेते बोलण्या ऐवजी छोट्या कार्यकर्त्यांनी बोलायला संधी द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की, शिवसैनिकांवर किती अन्याय होत आहे. आमच्या भागातील शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि गृहमंत्री वळसे पाटील नाहक त्रास देत आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा पाढा राऊत यांच्यासमोर वाचला. यावेळी माजी मंत्री सचिन आहीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अरुण गिरे, समाधान डोके, नितीन दरेकर, वैभव ढोकले, कांताराम नप्ते, अविनाश साकोरे, संतोष भोंडवे यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
Add Comment