राजकीय शिरूर

राष्ट्रवादी तालुका अध्यक्षच्या गावात भाजपची मुसंडी, राष्ट्रवादीचा दारुण पराभव…!

भाजप तालुकाध्यक्षाने घेतला समाचार..!

शिरूर, पुणे | शिरूर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला तर अनेकांनी आपले नेतृत्व सिध्द केले. यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आपल्या निर्वि गावाच्या सोसायटीवर सत्ता कायम ठेवली, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधीर फराटे यांनी देखील मांडवगण फराटा सोसायटीवर भगवा फडकवला, मात्र सगळ्याच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. काळे यांची स्वतःची एकच जागा निवडून आली मात्र भाजप पुरस्कृत पॅनेलने १२ जागांवर विजय मिळवला.

तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत त्याचबरोबर गावपातळीवर असणाऱ्या देखील सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीची चांगलीच पकड आहे. मात्र सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणाऱ्या तालुका अध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीची पिछेहाट झालेली पाहायला मिळत आहे. याशिवाय शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने राष्ट्रवादीची दमछाक केली आहे. याचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

“आगामी काळात भाजपला उमेदवार मिळणार नाही” अशा वल्गना करणाऱ्या रविंद्र काळे यांना स्वतःच्या गावातीलच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागा दाखवून दिली. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गावच्या सोसायटीच्या निवडणूकित स्वतःच उमेदवार होऊन निवडणुकीत उतरावे लागले त्यातही निसटता आणि अल्प मतांनी विजय मिळाला. गावच्याच मतदारांनी फुशारक्या मारणाऱ्यांना उंची दाखवून दिली आहे त्यामुळे आता भाजपची चिंता करणाऱ्यांना स्वतःची चिंता करण्याची वेळ आली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी हा विजय मिळाल्यानंतर The बातमी’शी बोलताना सांगितले.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी पाबळच्या उपबाजार केंद्राचे उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बोलताना रविंद्र काळे यांनी भाजपवर निशाणा साधत आगामी काळात भारतीय जनता पार्टीला शिरूर – हवेलीमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवार मिळणार नाही. असे वक्तव्य केले होते, त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपने काळे यांच्या पॅनलला त्यांच्याच गावात पराभूत केले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!