राजकीय शिरूर

गृहमंत्री वळसे पाटील यांनी खंत व्यक्त करत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे टोचले कान..!

शिरूर, पुणे | नुकतीच अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दांत सोशल मीडियावर टीका केली. याप्रकरणी अभिनेत्री चितळे हिला अटक देखील करण्यात आली. मात्र अशा प्रकारे आपल्या नेत्यावर कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल तर, अशा लोकांचा किमान निषेध तरी व्यक्त करायला हवा. अशा प्रकारची खंत व्यक्त करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भर भाषणात व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे.

दरम्यान करंदी (ता. शिरूर) येथील एका शाळेच्या इमारत उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद पवार आज वयाच्या ८० व्या वर्षी दिवस रात्र पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत आहेत मात्र काही लोकांकडून त्यांच्यावर विनाकारण काही सबंध नसताना खालच्या भाषेत टिका केली जाते, मात्र अशा वेळी व्यासपीठावरील कार्यकर्ते किमान अशा लोकांना उत्तर द्यायला पुढे का येत नाहीत, अशी वळसे पाटील यांनी खंत व्यक्त केली. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, देवदत्त निकम, केशरताई पवार, प्रदीप वळसे पाटील, शेखर पाचूंदकर, प्रकाश पवार, सुभाष उमाप, मानसिंग पाचूंदकर, सविता बगाटे, प्रमोद पऱ्हाड, सविता पऱ्हाड, शंकर जांभळकर, राजेंद्र ढोकले सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबन ढोकले यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी जावेद इनामदार या कार्यकर्त्याचा नुकताच विवाह संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित न राहता आल्याने इनामदार यांच्या घरी वळसे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी देखील कार्यकर्त्यांशी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी पुन्हा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची हजेरी घेतली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आम्हाला याबाबत विचारणा करतात त्याअगोदर स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे येऊन उत्तर द्यायला हवे किमान निषेध तरी व्यक्त करायला हवा. अशा प्रकारची विचारणा केली असता, आमदार अशोक पवार यांनी याबाबत खुलासा करत सोशल मीडियावर आम्ही निषेध व्यक्त केला असल्याचे सांगितले. यावर केवळ सोशल मीडियावर निषेध व्यक्त करून चालणार नाही आपला प्रमुख विरोधक भाजप आहे. त्यांना वेळीच आवर घालायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देखील यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

error: Copying content is not allowed!!!