तळेगांव ढमढेरे, पुणे | विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुक अनेक गावांतील नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आणि याच निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना गावातील सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. शिरूर तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थांवर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळत होते, मात्र यावेळी अनेक गावांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपला करिष्मा दाखवून दिला आहे.
शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास शिवले यांच्या शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) या गावातील सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिवले यांनी स्वतःची एक जागा मोठ्या शिताफीने बिनविरोध निवडून आणली. मात्र निवडणुकीच्या रिंगणात केवळ आणखी एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवले यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या हनुमंत शिवले यांनी सलग पाचव्यांदा सोसायटीवर निवडून जात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादीचे विकास शिवले आणि भाजपचे हनुमंत शिवले या दोघांनी परस्पर विरोधी पॅनलचे नेतृत्व केले होते.
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी विजयी उमेदवारांचा सन्मान केला. पूर्वाश्रमीचे भाजपचे सहकारी विकास शिवले यांनी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या गटातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांच्या गटात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उपसभापती पदाचे गिफ्ट देखील त्यांना मिळाले. मात्र नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत स्वतःच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
राष्ट्रवादीच्या भाजपला शुभेच्छा…!
दरम्यान तालुक्यातील अनेक गावांत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना स्वतःच्या गावातील सोसायटीवर वर्चस्व ठेवता आले नाही. पर्यायाने भाजपने मुसंडी मारत अनेक गावांत विशेषतः शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. योगायोगाने भाजपच्या तालुकाध्यक्ष पदाची माळ आबासाहेब सोनवणे यांच्या गळ्यात पडल्यानंतर हे चित्र पाहायला मिळत असल्याने शिरूर – आंबेगाव मतदार संघातील एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने सोनवणे यांना शुभेच्छा देताना “तुमच्या पायगुणाची कमाल आहे, भविष्य काळात देखील असाच विजय मिळत राहो” अशा शुभेच्छा दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
Add Comment