शिरूर

चासकमानच्या पाण्यावरून पुन्हा धुसफूस, रोहित्र बंद, चाऱ्या लॉक…!

शिक्रापूर, पुणे | चासकमान धरणाचे पाणी शिरूर तालुक्याला वरदान ठरले, मात्र शिरूर तालुक्यातच या पाण्यासाठी धुसफूस पहायला मिळत आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात या पाणी मिळवण्यासाठी वाद, आंदोलने केली जात आहेत. पर्यायाने अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

गेल्या वर्षी अशाच प्रकारे पश्चिम भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने करंदी, जातेगाव, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव, पिंपळे जगताप, वाजेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. आता यावर्षी देखील अशीच पाण्यासाठी धुसफूस सुरू झाली आहे. गणेगाव, पिंपळे खालसा या भागातील बहुतांश शेतकऱ्यांच्या कालव्याच्या बाजूला असणाऱ्या रोहित्रांचे विजजोड काढून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. कालव्यातून उपसा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे देखील अन्यायकारक रोहित्र बंद करण्याचे काम वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

दरम्यान करंदी, मांजरेवाडी, जातेगाव, मुखई या भागातील सगळ्या चाऱ्या लॉक करण्यात आल्या आहेत. हे सगळं पाणी शिरूरच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात जाण्यासाठी महावितरणचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यथायोग्य प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांवर अन्याय का ? या भागातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे.? एक महिना होऊन गेला मात्र आमच्या चाऱ्यांना मागणी करून देखील पाणी सोडले जात नाही. अशा भावना जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके, रोहित खैरे यांनी व्यक्त केल्या.

गणेगाव, पिंपळे खालसा या गावांतील रोहित्र बंद केल्याने कालव्याच्या जवळपास असलेल्या विहिरीतून देखील पाणी उपसा करण्याची आम्हला परवानगी नाही का.? अधिकारी मनमानी कारभार करत आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत नाही. भाजी, तरकरी पिकांचे पाण्यावाचून नुकसान होऊ लागले आहे. लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार असा सवाल ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब गावडे यांनी उपस्थित केला आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!