शिरूर, पुणे | सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. तत्पूर्वी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधी गटाने बैठकीसाठी सर्वपक्षीय सभासदांना साद घातली आहे. येत्या २७ मे रोजी मांडवगण फराटा येथे बैठकीचे आयोजन केले असल्याचे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान कारखान्याच्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे, यामध्ये वीस ते पंचवीस टक्के मतदार हे मयत आहेत. त्यांच्या वारसांना सभासदत्वचा अधिकार मिळावा यासाठी या गटाने मोहीम हाती घेतली आहे. मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्वचा अधिकार मिळावा यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. जाणून बुजून मयत सभासदांच्या वारसांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम सत्ताधारी गट करत आहे. मात्र हे षडयंत्र आम्ही हाणून पडणार असल्याचे कारखान्याचे माजी संचालक सुरेश पलांडे यांनी यावेळी सांगितले.
१९८९ साली कारखान्याची नोंद झाली त्यानंतर आत्तापर्यंत मयत सभासदांचा आकडा मोठा झाला आहे. सत्ताधारी गटाने मयत सभासदांच्या वारसांना समाविष्ट करून घेणे आवश्यक असताना मात्र यावर कुठलीही कार्यवाही केली जात नाही, याउलट ज्या वारसदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे अशांना देखील न्याय मिळत नाही. त्यामुळे जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याची अंतिम तारीख येत्या ३१ मे पर्यंत आहे.मयत सभासदांच्या वारसदारांनी जागरूक होऊन बोगस मतदान टाळण्यासाठी आपली कागदपत्रे जमा करावी. अशा प्रकारचे आवाहन संचालक सुधीर फराटे यांनी केले.
आर्थिक संकटात असलेल्या कारखान्याला बाहेर काढण्यासाठी सर्व पक्षातील सभासदांनी एकत्र येण्याची गरज आहे, येणाऱ्या काळात शिवसेना, भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, जनता दल यांसह अन्य छोट्या छोट्या पक्षांना, संघटनांना आम्ही आवाहन करणार आहोत. एवढच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सभासदांनी देखील आम्ही एकत्र यावं असे आवाहन करत असल्याचे काकासाहेब खळदकर यांनी सांगितले. यावेळी आबासाहेब सरोदे, राजेंद्र कोरेकर, कैलास सोनवणे, प्रकाश गव्हाणे, वैजयंती चव्हाण. आदी उपस्थित होते.
Add Comment