मांडवगण फराटा, पुणे | रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही दिवसांत होणार आहे, त्यामुळे विरोधी गटाच्या प्रमुखांनी आगामी काळातील निवडणूक लढवायची की, नाही ? यासंदर्भात सभासदांचे विचार जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आर्थिक संकटात सापडलेला कारखाना, सभासदांच्या वारसांचा हक्क आणि सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही यावर बोट ठेवून सभासदांनी त्याचबरोबर सभासदांच्या वारसदारांनी आपली मते व्यक्त करत कारखाण्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर तीन हजार रुपये मताला नाही, पण ऊसाला तीन हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन देऊन आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
यावेळी अडीच हजारपेक्षा अधिक सभासद, वारसदार यांच्याकडून एका छापील पत्रकाद्वारे निवडणुकीबाबत मते जाणून घेतली. यामध्ये केवळ वीस जणांनी आगामी निवडणुकी संदर्भात चिंता व्यक्त केली. मात्र उर्वरितांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची मत नोंदविले. दरम्यान आगामी निवडणूकीची रणनीती आणि प्रमुख धोरणांवर विचारविनिमय करून राजेंद्र कोरेकर यांनी ठराव मांडला की, उद्याची होणारी निवडणूक ही सर्वपक्षीय असेल, याशिवाय मतदारांना कोणतेही प्रलोभन न देता बिनखर्चीक निवडणूक होईल आणि ही निवडणूक ‘घोडगंगा किसान क्रांती’ या पॅनल खाली लढवली जाईल. या ठरावावर उपस्थितांनी एकमुखाने बहुमत व्यक्त करत निवडणूक लढवायची असे निश्चित केले. यावेळी कोरेकर यांनी बोलताना आर्थिक घोडेबाजार, दहशत, एकाधिकारशाही, यामुळे निवडणूक लढवावी की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशोक पवारांनी यापूर्वीच्या निवडणुका अनेक क्लुप्त्या करून निवडणूक जिंकल्या आणि कोजन प्रकल्पावर खापर फोडून बाजारभाव कमी दिला. आता सभासदांना मतांचा भाव नको तर उसाचा भाव हवा अशी भावना निर्माण झाली आहे. येणारी निवडणूक ही आर्थिक ताकदीविरहित निवडणूक असेल असे सांगितले.
दरम्यान जयेश शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत ‘नुसतं धुराडं पेटतंय आणि कर्ज वाढतय’, कारखान्यातील शेतकऱ्यांचे पैसे पुण्यात राहणाऱ्यांना वाटले जातात तर, आबासाहेब सोनवणे यांनी देखील बोलताना माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची परवानगी घेऊन सर्वपक्षीय पॅनलला पाठिंबा दिल्याचे सांगत तरडोबाचीवाडी पासून तांदळी पर्यंत आणि तांदळीपासून तळेगाव ढमढेरे पर्यंत नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य मतदारांनी पराभवाची धूळ चाखायला लावली असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर सुधीर फराटे यांनी बोलताना तालुक्यात एकूण चाळीस लाख टनाहून अधिक ऊस उत्पादन होतो. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना केवळ सहा लाख टन ऊस गाळप करतो, हे सत्ताधाऱ्यांचे सपशेल अपयश आहे. कारखान्याचे चेअरमन पाच वर्षांत होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाग घेतात त्यामुळे निवडणुकांचा सगळा ताण कारखाना प्रशासनावर येतो असे सांगितले.
यावेळी लक्ष्मण फराटे, संजय पवार, संजय घाडगे, दिनेश दरेकर, महेश घाडगे, सुरेश थोरात, सुरेश पलांडे, अरविंद ढमढेरे, यांनी कारखाना प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. दरम्यान दादा पाटील फराटे यांनी सभासदांना भावनिक आवाहन करत आगामी निवडणूक ही केवळ शेतकऱ्यांनी हातात घेऊन लढवली जावी, मी उमेदवार म्हणून तुम्हाला पसंत नसेल तर मी थांबतो मात्र आर्थिक संकटात सापडलेला कारखाना बाहेर काढण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनीच घ्यायला हवी असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना, सर्वात कमी बाजारभाव, आमदार अशोक पवार यांची एकाधिकारशाही या सगळ्या संकटावर आता एकमेव पर्याय उरला आहे. शेतकरी सभासदांनी ठरवलेल्या ‘घोडगंगा किसान क्रांती’ या पॅनेलच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे. एका मताला आम्ही तीन हजार रुपये बाजारभाव देऊ शकत नाही. मात्र ऊसाला आम्ही तीन हजार रुपये प्रति टन बाजारभाव देऊ आणि आर्थिक संकटात असलेला कारखाना केवळ तीन वर्षात बाहेर काढू अशा प्रकारचे नियोजन आम्ही करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून अभ्यास केला आहे. कोणतीही प्रलोभने आली तरी आम्ही मागे हटणार नाही, त्यामुळे आम्ही मताला नाही पण ऊसाला तीन हजार रुपये बाजार देऊ असे आश्वासन दादा पाटील फराटे यांनी यावेळी दिले.
Add Comment