पुणे राजकीय शिरूर

‘दीड वर्ष मी तुमचं ऐकलं एकदा माझं ऐका’, पाचर्णे साहेब पुन्हा शिरुरला परतले ते कधीच न येण्यासाठी..!

पुणे | अखंड शिरुर तालुका दुःखाच्या सागरात लोटला कारण शिरुर तालुक्यातील खरा लोकनेता आपल्या कार्यकर्त्यांना पोरकं करून गेला. गेले दीड वर्ष कर्करोगाच्या विळख्यात अडकलेला आपला नेता आता आपल्यात उरला नाही हे दुःख पचवणं पाचर्णे साहेबांच्या कार्यकर्त्यांना आता जड जात आहे. शिरुर – हवेली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं दुर्धर आजाराने निधन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांसारख्या अनेक बड्या लोकांनी माजी आमदार पाचर्णे यांची नुकतीच भेट घेऊन कुटुंबाला आधार दिला. मात्र पाचर्णे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली आणि रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान माजी आमदार पाचर्णे यांना पोटाचा आजार जाणवला या धावपळीच्या राजकीय जीवनात आजाराकडे दुर्लक्ष केल्याने तो आणखी बळावला, गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयात या दुर्धर आजारावर ते उपचार घेत होते. काही अंशी बरं वाटू लागल्याने त्यांनी पुन्हा एक वर्षाच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या रूपाने शिरुर तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला मात्र पुन्हा त्यांना या आजाराच्या कारणाने राजकारणापासून दूर जावं लागलं ते कायमचच. आजारी असूनही त्यांनी घोडगंगा सहकारी कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कारखाना वाचविण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजार वाढत होता आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या.

संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामपंचायत सदस्य पदापासून तालुक्याच्या बाजार समितीचे सभापती असा प्रवास करत पुढे १९९५ साली त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली याच निवडणुकीची सर्व सूत्रे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी सांभाळली होती. अवघ्या ६७८ मतांनी पोपटराव गावडे यांनी पाचर्णे यांचा पराभव केला. पुन्हा १९९९ साली काँग्रेसची उमेदवारी घेऊन पोपटराव गावडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली, यावेळी देखील पराभूत झाले. हार न मानता त्यांनी २००४ च्या निवडणुकीत मात्र गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची उमेदवारी दिल्याने पोपटराव गावडे यांचा पराभव करून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. पुन्हा २००९ साली अपक्ष तेही स्वकीयांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. म्हणजेच जुने मित्र अशोक पवार त्याचबरोबर तालुक्याच्या राजकारणात सोबत असलेले मंगलदास बांदल आणि निवृत्ती गवारे यांनी पाचर्णे यांना विधानसभेत जाण्यास रोखले आणि अशोक पवार पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. पुन्हा भाजपच्या उमेदवारीवर २०१४ साली अशोक पवार यांचा पराभव करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या कार्यकाळात शिरुर आणि हवेली तालुक्यात मोठी विकासकामे उभी केली. शेवटी पुन्हा २०१९ साली अशोक पवार यांनी पाचर्णे यांचा पराभव केला.अशा प्रकारच्या सहा विधानसभेच्या निवडणुका माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी लढविल्या.

दीड वर्ष आजाराशी झुंज देत असताना डॉक्टरांनी अनेक उपचार केले, कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेऊन अनेक वैद्यकीय निर्णय घेतले, नातेवाईक, मित्रपरिवार या सगळ्यांनी मोलाची साथ दिली. डॉक्टरांचे उपचार झाले, तुम्हा सर्वांचं मी गेले दीड वर्ष सगळं ऐकलं तुम्ही सांगाल तसं केलं आता माझं एक ऐका, मला माझ्या माणसांच्यात घेऊन चला, मला शिरूरच्या कार्यालयात जायचय, तिथे मी बरा होईल अशी मागणी पाचर्णे यांनी कुटुंबीयांकडे केली. त्यानंतर त्यांना शिरुरच्या बाबुराव नगर येथील त्यांच्या खाजगी विश्रामगृहात ठेवण्यात आले. दरम्यान पुण्यावरून येताना प्रवासात प्रत्येक गावाची आठवण काढत काढत त्यांनी शिरुर गाठले. त्यानंतर असंख्य लोकांनी त्यांची भेट घेतली. अनेकांशी त्यांनी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला. यादरम्यान अनेक दिवस मृत्यूशी झुंज देत असताना कार्यकर्त्यांनी विविध गावातील मंदिरात देवाकडे साकडं घातलं. मात्र झुंज अपयशी ठरली आणि माजी आमदार लोकनेते बाबुराव पाचर्णे हे काळाच्या पडद्याआड गेले. संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे. नेहमी सवलीसारखे सोबत असणारे कार्यकर्ते अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. शिरुरच्या इतिहासात अंत्ययात्रेला एवढी मोठी गर्दी कधीही कोणी पहिली नव्हती. हजारोंच्या संख्येने पाचर्णे साहेबांना अखेरचा निरोप दिला. अमर रहें अमर रहें, पाचर्णे साहेब अमर रहें….!

error: Copying content is not allowed!!!