शिरुर, पुणे | शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकताच आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गावभेट दौवऱ्यात असताना एक गौप्यस्फोट केला होता. त्याला अनुसरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोपरखळी लागवत आढळराव पाटील यांना प्रतिउत्तर दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे बोलताना ‘हा शिरुर लोकसभा मतदार संघ शिवसेनेने माझा घरचा मतदार संघ सोडून मला पुणे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा, तसेच शिरूर मतदारसंघात फिरू नका, असे सांगितले. शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे. मला दुसऱ्या मतदारसंघात पाठवून येथील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी नव्हे; तर पार्थ पवार यांच्यासाठी शिरूर मतदारसंघ सुरक्षित करायचा आहे’, असा गौप्यस्फोट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता.
त्याला प्रतिउत्तर म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार आढळराव पाटील यांना कोपरखळी लगावली आहे डॉ. कोल्हे म्हणाले की, जर हा शिरुर लोकसभा मतदार संघ आता शिवाजीदादांना राष्ट्रवादीसाठी सुरक्षित वाटत असेल तर खरच ही माझ्या कामाची पावती मी मानतो, या मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे आणि रखडलेल्या कामांना पूर्णत्वाकडे नेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर हा मतदार संघ सुरक्षित होतोय ही भावना जर शिवाजीदादांची झाली असेल तर मला आनंदच होईल. एवढ्या मोठ्या जेष्ठ माणसाने माझ्यासारख्याच्या कामांचे केलेले हे कौतुकच आहे असे मी मानतो. शिवाजीदादांनी तब्बल पंधरा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि गेल्या पंधरा वर्षांत जे काही प्रश्न प्रलंबित होते ते गेल्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचं भाग्य मला पवार साहेब आणि अजित दादांच्या माध्यमातून लाभलं. त्यामुळे शिवाजी दादांनी केलेलं विधान हे माझ्यासाठी कौतुकाची थाप आहे असं मानतो.
अशा प्रकारे माजी खासदार आढळराव पाटील यांचे विधान खासदार डॉ. कोल्हे यांनी सकारात्मक घेत धूर्त स्वभावानुसार आढळरावांनी केलेला गौप्यस्फोट आढळरावांनाच कोड्यात पडणारा ठरविला आहे. आता यावर आढळराव पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…!
Add Comment