पाबळ, पुणे | जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. इच्छुक उमेदवार घुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातच आता जुना केंदूर -पाबळ जिल्हा परिषद गट आणि आता नव्याने रचना झालेला करंदी – कान्हूर मेसाई गटातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यात नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीनुसार हा गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे. परंतु नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने जुन्या प्रभाग रचनानुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. असं सगळं असताना केंदूरकरांच्या मागणीला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र हिरवा कंदील दिला की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी केंदूरच्या इच्छुक उमेदवारांना डावलले आहे. मोठ्या मतदार संख्येचे गाव असूनही इच्छुकांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यातच पाबळला मात्र दोन वेळा उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची केंदूरकरांनी यापूर्वी अनेकदा तीव्र मागणी केली आहे. या मागणीला दिलीप वळसे पाटील सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा केंदूरच्या इच्छुक उमेदवारांना आहे. त्यातच रविवारी (दि.१४) रोजी पाबळ येथील एका खाजगी कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली त्यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी केंदूरकरांना जिल्हा परिषदच्या उमेदवारीबाबत संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.
पाबळ येथील एका खाजगी कार्यक्रमात वळसे पाटील बोलताना उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार पिंगळे आणि सविता बगाटे यांच्याकडे नजर टाकत म्हणाले की, “केंदूरकर किती खुश आहेत माहीत नाही मात्र पाबळकर नक्कीच खुश आहेत”. असं म्हणत पुढे थिटेवाडी बंधारा १००% भरला असल्याचा संदर्भ देत पाबळकर खुश असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्यामुळे पाबळकरांना दोन वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली आता केंदूरकरांना अपेक्षा लागल्या असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर होईपर्यंत आणि उमेदवारी मिळेपर्यंत का होईना केंदूरकरांना आशावादी राहायला हरकत नाही.











Add Comment