पुणे | शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाऊले भाजपच्या दिशेने पडू लागली की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेच्या तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठ्या फरकाने पराभूत करून शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते खासदार बनले. परंतु अजूनही राष्ट्रवादीची विचारसरणी आत्मसात होत नाही की, देशात सर्वात मोठा हिंदुत्ववादी पक्ष असलेला भाजप त्यांना खुनावतोय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपच्या “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” या ब्रीदवाक्यातील ‘राष्ट्र प्रथम’ हा उच्चार सातत्याने भाषणात डॉ. कोल्हे गेल्या काही दिवसांपासून करत आहेत, त्यामुळे भाजपच्या ब्रीदवाक्याची भुरळ डॉ. कोल्हे यांना पडली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपूर्वी नथुराम गोडसेची भूमिका सकारल्यामुळे डॉ. कोल्हेंवर स्वपक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह गांधीवादी विचारवंतांनी, नेटकर्यांनी एवढंच काय तर अनेक पत्रकारांनी देखील शाब्दिक हल्ला केला होता. त्यानंतर राष्ट्र प्रथमचा सातत्याने उल्लेख आणि आता चित्रपटातूनही भाजपचाच अजेंडा राबविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे करत आहेत की काय ? असा सवाल उपस्थित होतोय. त्याचं कारण असं की, आगामी येऊ घातलेला डॉ. कोल्हे यांचा ‘शिवप्रताप, गरुडझेप’ या चित्रपटाचा नुकताच आज (दि. १२ सप्टेंबर) रोजी ट्रेलर प्रदर्शित झाला त्यातही हिंदुत्ववादाचा प्रमुख मुद्दा घेऊनच ट्रेलर प्रदर्शित केला असल्याचे प्रकर्षाने जाणवते. या ट्रेलरमधील आवर्जून घेतलेला डॉ. अमोल कोल्हे यांचा हिंदुत्ववादी डायलॉग – “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल, त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो”
त्यामुळे सातत्याने भाजपचा अजेंडा राबविणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा भाजपच्या दिशेने प्रवास सुरू आहे की काय ? असा प्रश्न विचारला जातोय. यापूर्वी अनेकदा डॉ. कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी माजी खासदार आढळराव पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या केवळ चर्चा मतदार संघात ऐकायला मिळत होत्या, मात्र आता आढळराव पाटलांना बाजूला सारून खासदार डॉ. कोल्हेच भाजपच्या गोटात सामील होणार की काय अशा शंका आता निर्माण होऊ लागल्या आहेत.
Add Comment