राजकीय शिरूर

वडगाव रासाईत अनधिकृत शिक्षणाचा कारभार अखेर बंद…!

शिरुर, पुणे | वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विनापरवाना सहावी आणि सातवीचा वर्ग सुरू होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर एका दिवसात अनधिकृतपणे वडगाव रासाई (ता. शिरुर) येथे सुरू असलेले वर्ग तात्काळ बंद करून विध्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा असा आदेश जिल्हा परिषदेने काढला आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांची नोंद संगणक प्रणालीत देखील आढळून येत नाही, सहावी आणि सातवीच्या वर्गाला परवानगी नसतानाही अनधिकृतपणे दोन वर्ग सुरू आहेत, मुबलक शिक्षक उपलब्ध नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, गावात इतर संस्थेची शाळा उपलब्ध असूनही विनापरवाना वर्ग सुरू ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी सुरू आहे? असा सवाल करत भाजपचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ग्रामपंचायतचा, ग्रामसभेचा ठराव असूनही जिल्हा परिषदेचे अधिकारी सातत्याने याकडे दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या खोट्या राजकीय प्रतिष्ठेसाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील अनधिकृत शाळा बंद का होत नाही, असा सवाल काकासाहेब खळदकर यांनी उपस्थित केला.
याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असताना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जाऊन आक्रमक होत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. अनधिकृतपणे सुरू असलेले वर्ग बंद करून विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे लावून धरली होती. त्याला प्रतिसाद देत पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी विनापरवाना सुरू असलेले दोन वर्ग बंद करण्याचे आदेश जारी केला आहे.

गेल्या दोन- तीन वर्षांपासून आमदार अशोक पवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी राजकीय दबाव वापरून चुकीच्या पद्धतीने विनापरवाना वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. विध्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही सातत्याने याला विरोध केला. परंतु आमच्या विरोधाला झुगारून राजकीय स्वार्थासाठी हा प्रकार सुरूच ठेवला. शेवटी आम्ही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. – सचिन शेलार (सरपंच, वडगाव रासाई – शिरूर )

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!