घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक.
शिरुर, पुणे | रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काल (गुरुवार दि. २७ रोजी) नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरचा दिवस होता. यात कारखान्याच्या स्थापनेपासून माजी आमदार पोपटराव गावडे हे एक टर्म मुलगा राजेंद्र गावडे यांच्या संचालक पदाची वगळता माजी आमदार गावडे हे नेहमी संचालक राहिलेले आहेत. तर प्रकाश पवार हे देखील गेली एक टर्म कारखान्याचे संचालक राहिलेले आहेत. मात्र यावेळी दोनही कुटुंबातील एकही सदस्य घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित उमेदवार नाहीत. त्याचबरोबर आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज अशोक पवार याची कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध म्हणून निवड झाली असल्याने कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात ऋषिराज याची एन्ट्री झाली आहे.
विरोधी गटाचे प्रमुख दादा पाटील फराटे यांच्यासह पांडुरंग थोरात, आबासाहेब गव्हाणे, ऍड सुरेश पलांडे, सावित्रा थोरात, महेश अरविंद ढमढेरे, राहूल गवारे हे प्रमुख चेहरे कारखाना संचालक मंडळाच्या निवडणूकीत पाहायला मिळणार आहेत. दरम्यान सत्ताधारी गटाचे प्रमुख आणि गेली अनेक वर्षे चेअरमन राहिलेले आमदार अशोक पवार हे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात दिसणार आहेत. बहुचर्चित ठरलेल्या महिला प्रतिनिधी गटातून आमदार पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्याचबरोबर संस्था ‘ब’ गटातून विरोधकांना मात्र उमेदवार न मिळाल्याने आमदार पवार यांचे सुपुत्र ऋषिराज पवार हे बिनविरोध संचालक ठरले आहेत.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी व्हाईस चेअरमन प्रकाश पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता. त्याचप्रमाणे आता सुरू असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीतूनही प्रकाश पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान इतर मागास प्रवर्गातील विरोधी गटाची उमेदवारी राजेंद्र गदादे यांच्या ऐवजी राहुल गवारे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे पॅनेल निवडून आल्यानंतर गदादे यांना पाच वर्षे स्वीकृत संचालक म्हणून संधी देणार असल्याचे दादा पाटील फराटे यांनी सांगितले.
Add Comment