घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक.
शिरुर, पुणे | रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या शुभारंभाच्या दिवशीच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. विरोधक विनाकारण कारखान्याची बदनामी करत आहेत, कर्जाचा खोटा आकडा सांगून सभासदांची दिशाभूल करत आहेत, मी सामोरा समोर बसायला तयार आहे. जर कारखान्यावर विरोधकांनी सांगितल्याप्रमाणे साडेचारशे कोटी रुपये एवढं कर्ज असेल तर मी राजकारण सोडून देईल आणि हे आरोप खोटे ठरले तर विरोधकांनी राजकारण सोडून द्यावे. असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार अशोक पवार यांनी केले. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी विरोधी गटाचे सुधीर फराटे, काकासाहेब खळदकर, राहुल पाचर्णे, आबासाहेब सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन चेअरमन पवार यांचे आवाहन स्वीकारत ठिकाण आणि वेळ तुम्ही सुचवा आम्ही तयार आहोत सभासदांनाही कळूद्या कोण खोटं आणि कोण खरं.
यावेळी सुधीर फराटे यांनी सांगितले की, गेली चार वर्षे आम्ही विविध माध्यमातून सभासदांच्या समोर हे मांडत आलोय, त्याचबरोबर कारखान्याचा जो ३० वा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यातील पान क्रमांक ७ वर मार्च २०२२ अखेरचं देणं ३८५ कोटी ६४ लाख इतके दाखवले आहेत तर ४१ कोटींचा तोटा म्हणजेच एकूण ४२६ कोटींचा देणेकरी आपला घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या अहवालाचा विचार केला तर त्यातही ४५९ कोटी ५५ लाख रुपयांचा देणेकरी आपला कारखाना आहे. आम्ही हे जे आकडे खोटे सांगत असू तर आमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा असे आवाहन आम्ही गेल्या वर्षीच केले आहे. यावर्षी मोठा गाजावाजा करून गळीताचा शुभारंभ केला, तरीही काही शेतकऱ्यांचा ऊस तोडून १० दिवस वाळत होता याला जबाबदार कोण ? साखरेच्या आकडेवारीमध्ये ताळेबंदीचा भुलभुलैय्या केला जातो यांसह अनेक आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहेत,
केवळ पिशवीतील सहकारी संस्था सभासद…!
काकासाहेब खळदकर यांनी सांगितले की, कारखाना स्थापनेपासून एकूण १५०० शेअर्स सहकारी संस्थांसाठी अबाधित ठेवले आहे, तालुक्यात १३० सहकारी संस्था लोकाभिमुख काम करत आहेत मात्र २५ वर्षांत केवळ २६ सभासद केले. मात्र केवळ ८ संस्था कारखान्याने सभासद केल्या आहेत. त्या केवळ पिशवीतील सहकारी संस्था आहेत. त्या लोकाभिमुख काम करत नाही आणि अशा सुरक्षित संस्था ‘ब’ गटातून चेअरमन अशोक पवार यांनी आपला मुलाला उमेदवारी देऊन बिनविरोध संचालक केले. कारखान्याला भागभांडवलाची गरज असतानाही तालुक्यातील सहकारी संस्था सभासद करून घेतल्या नाही. मयत वारसांनाही अजून न्याय मिळाला नाही. मग आपल्या मुलाला कसे सभासद करून घेतलं ते बाकीच्या वरसांनाही सांगा आणि त्यांनाही सभासद करून का घेतलं नाही.? असा सवाल खळदकरांनी उपस्थित केला.
दरम्यान कारखाना संचालक मंडळ निवडीच्या तोंडावर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. गेले २५ वर्षे चेअरमन असलेल्या अशोक पवार यांच्यावर विरोधकांनी कारखाण्यासंबंधी वेगवेगळे आरोप केलेले आहेत. त्यामुळे कारखान्याची बदनामी विरोधक करत आहेत, सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे मत यापूर्वीही अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे. एकमेकांना राजकारण सोडून देण्याचे आवाहन केले जात आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत त्यात सामोरा समोर बसण्याचे एकमेकांना दिलेले आवाहन सत्ताधारी आणि विरोधक आता स्वीकारून चर्चा खरच होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी आत्माराम फराटे, मेहबूब सय्यद, गोविंद फराटे, सचिन शेलार, सचिन मचाले, अनिल बांडे, राहुल पवार, संभाजी रणदिवे, अमोल महाजन, बाबुराव पाचंगे, धनराज पाचर्णे, रवी लेंडे आदी उपस्थित होते
Add Comment