Uncategorized

१८ वर्षे हेलपाटे घालतोय माझी वारस सभासद नोंद का नाही ? भर प्रचार सभेत चेअरमन पवारांना प्रश्न, फ्लेक्स लावून लक्ष वेधले.

शिक्रापूर, पुणे | रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत अटीतटीच्या वातावरणात सुरू आहे. सत्ताधारी गटाचा प्रचार दौरा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल मंगळवार (दि. १ रोजी) पार पडला. दरम्यान मुखई येथे प्रचारार्थ चेअरमन अशोक पवार बोलत असताना सचिन पलांडे या युवकाने उठून “माझे आजोबा मयत आहेत त्यांच्या सभासदत्वचा शेअर्स आमच्या कुटुंबातील वारसाच्या नावे व्हावा म्हणून मी गेली अठरा वर्षे प्रयत्न करतोय, आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही प्रतिज्ञापत्र देखील दिले तरीही वारस हक्क का मिळाला नाही” असा प्रश्न भर सभेत उपस्थित केला. त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एवढा बाजारभाव देतो मग आपला कारखाना का तेवढा बाजारभाव देत नाही.? हा प्रश्न देखील पलांडे यांनी विचारला.

दरम्यान अशोक पवार यांनी उत्तर देताना मयत सभासदांच्या कौटुंबिक वादाचा संदर्भ दिला त्यामुळे वारसदारांना सभासद होण्यास अडचणी येत आहेत. त्याचबरोबर बाजारभाव बाबत बोलताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि तत्कालीन राज्य सरकारने कोजन प्रकल्प रखडवला व वीज करार देखील कमी पैशात केल्यामुळे बाजारभाव बाबत अडचणी आल्या असल्याचे उत्तर दिले. त्यावर पलांडे यांनी “माझ्यासारखे असे चार हजार वारसदार आहेत सर्वांचेच कौटुंबिक वाद आहे का.? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्यानंतर माझ्या प्रश्नांचे उत्तर मला समाधानकारक मिळाले नाही असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

प्रचारादरम्यान चेअरमन अशोक पवार यांनी दादा पाटील फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीचा संदर्भ देत सडकून टीका केली तर अँड. सुरेश पलांडे यांच्यावरही टीका करताना पुनर्वसनच्या जमीनी लाटल्या असल्याचा संदर्भ दिला. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत माईकचा ताबा घेतलाच कसा यावर आक्षेप नोंदवला.

फ्लेक्स लावून विचारले प्रश्न…!


दरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या दौऱ्यात मुखई, पाबळ या भागात प्रचार सभेच्या ठिकाणी फ्लेक्सवर “साहेब, आपले स्वागत..! पैसे न वाटता तुमच्यासारखा कारभार करून निवडणूक कशी जिंकायची हे आमच्या बापूंना शिकवा.” त्याचबरोबर
बापू…. जाहीर कराच… घोडगंगा साखर कारखान्याचा आकडा एकदाचा जाहीर कराच.” अशा आशयाचा मजकूर टाकून शेतकरी सभासद आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि चेअरमन, आमदार अशोक पवार यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता.

error: Copying content is not allowed!!!