शिरुर, पुणे | नुकतीच रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली, पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमन, आमदार अशोक पवार यांनी कारखान्याच्या संचालक मंडळावर आपले एकहाती वर्चस्व सिध्द केले. एक बिनविरोधसह २० जागा जिंकून विरोधी गटाला केवळ एका जागेवर रोखून ठेवण्यात पवारांना यश आले आहे. या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या हिरहिरीने सहभागी असलेल्या शिरूर – आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांनी देखील पक्षाच्या पॅनेलची बाजू कणखरपणे खांद्यावर पेलवली असल्याचे दिसून आले.
सुरुवातीच्या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवार निश्चित करण्यापर्यंत पाचूंदकर यांनी आमदार अशोक पवार यांची खंबीर साथ दिली. दरम्यान आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या शिरूरच्या ३९ गावांतून मते मिळवण्यात पाचूंदकर यांचा सिंहाचा वाटा ठरला. उमेदवार निश्चित करताना ३९ गावांतून प्रकाश पवार आणि राजेंद्र गावडे यांची उमेदवारी अपेक्षित असताना मात्र दोघांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल दुबळा झाला असल्याचे चित्र निर्माण झाले होते. प्रकाश पवार यांनी वैद्यकीय कारण पुढे करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतून काढता पाय घेतला, तर गावडे कुटुंबियांची देखील अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे.
गावडे आणि पवार या दोन दिग्गजांनी माघार घेतल्यामुळे मतदारांवर याचा परिणाम होऊ नये म्हणून मानसिंग पाचूंदकर यांनी कंबर कसली. ३९ गावात प्रचाराची संपूर्ण यंत्रणा पाचूंदकर यांनी ताब्यात घेतली. या दरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या भागात दौरा करून घोडगंगा कारखान्याचा प्रचार केला. या भागातील काही प्रमुख पुढारी कारखान्याच्या प्रचारातून अलिप्त राहिलेले पाहायला मिळाले तर काहींची प्रचारात अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान पाचूंदकर यांनी मैदान न सोडता शेवटपर्यंत आमदार अशोक पवार यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा सांभाळली.
बूथ लावण्यापासून तर विजयाचा गुलाल घेईपर्यंत मानसिंग पाचूंदकर यांची लगबग सर्वश्रुत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिरूर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष या नात्याने पाचूंदकर यांची कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली. त्यामुळे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विजयाचे मुख्य सूत्रधार आमदार अशोक पवार जरी असले तरी मानसिंग पाचूंदकर यांचा देखील या विजयात सिंहाचा वाटा असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Add Comment