Uncategorized

…तोपर्यंत कारखान्याचे वाहन वापरणार नाही. – ऋषीराज पवार

शिरूर, पुणे | रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी चेअरमन आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार हे बिनविरोध संचालक बनले, पुढे आमदार अशोक पवार यांनी चेअरमन पदाची सूत्रे मुलगा ऋषीराज पवार यांची हाती सोपविली.

काल (दि. २२ नोव्हेंबर) रोजी ऋषीराज पवार यांनी चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी जोपर्यंत मी कारखान्याच्या चेअरमन पदाला साजेसे काम करत नाही तोपर्यंत स्वतःला चेअरमन म्हणवून घेणार नाही, आणि कारखान्याचे वाहन देखील वापरणार नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. वडील कारखान्याचे चेअरमन होते, त्याचबरोबर आमदार देखील आहेत परंतु चेअरमन पदाच्या कार्यकाळात वडील अशोक पवार यांनी कारखान्याच्या वाहनाचा पुरेपूर उपभोग घेतला. दरम्यान कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी विरोधी गटाच्या नेत्यांनी तत्कालीन चेअरमन अशोक पवार यांच्या प्रवास खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चार वर्षांच्या काळात पैकी दोन वर्षे कोरोना काळ असतानाही केवळ प्रवासावर कारखान्याचा २ कोटी ६४ लाखांचा खर्च केला गेला. हा मुद्दा निवडणूकीत चर्चेचा विषय ठरला होता.

दरम्यान नूतन चेअरमन ऋषीराज पवार यांनी वाहन न वापरण्याचा घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर कारखाना आर्थिक संकटातून जात असल्याने नूतन चेअरमन ऋषीराज पवार यांच्या खांद्यावर हा कारखाना संकटातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी असल्याने आगामी काळात कामगारांचे थकीत पगार पूर्ण करण्याची देखील मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जोपर्यंत मी चेअरमन पदाला साजेसे काम करत नाही तोपर्यंत मी स्वतःला चेअरमन म्हणवून घेणार नाही. त्याचबरोबर कारखान्याचे वाहन वापरणार नाही, हा निर्णय चेअरमन ऋषीराज पवार यांनी घेतल्याने सर्वच स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

घराचा दरवाजा उघडा ठेऊन मोरीला बोळा लावण्याचा हा प्रकार” – सुधीर फराटे
ज्या परिवाराने घोडगंगाच्या माध्यमातून स्वतःचा खाजगी कारखाना उभा केला, त्या परिवाराने असली काही नाटकं जाहीर करणे म्हणजे ‘घराचा दरवाजा उघडा ठेऊन मोरीला बोळा लावण्याचा हा प्रकार आहे’. जे आता चेअरमन झालेत त्यांनी स्वतःचा सातबारा तारण ठेऊन खाजगी कारखान्याला शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिले. ते आता सहकाराचे चेअरमन झालेत यावर आम्ही एक गाळप हंगाम पूर्ण झाल्यावर बोलू त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. अशा प्रकारची खोचक टीका कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे यांनी केली

error: Copying content is not allowed!!!