बेल्हा – जेजुरी मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
शिक्रापूर, पुणे | बेल्हा – जेजुरी मार्गावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना करणे आवश्यक असताना, वारंवार पाठपुरावा करूनही सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाद देत नसल्याने ‘रस्ता रोको आंदोलन’ करण्याचा इशारा शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी दिला आहे. ही बाब शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर शेडगे यांनी तात्काळ बैठक बोलावून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून १ डिसेंबर पर्यंत सर्वेक्षण करून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून रविवारी २७ नोव्हेंबर रोजी धामारी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचे जांभळकर यांनी निश्चित केले होते. परंतु यासंदर्भात पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे स्थानिक ग्रामस्थ बबनराव डफळ, एकनाथ डफळ, विकास डफळ, संतोष वाघोले, किरण ढोकले, नितीन ढोकले यांच्यासमवेत शंकर जांभळकर यांची बैठक पार पडली या बैठकीत बेल्हा – जेजुरी मार्गाचे प्रकल्प संचालक मिलिंद बारभाई यांच्याशी संपर्क करून येत्या ३० नोव्हेंबर रोजी स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक रस्ता सुरक्षा समितीचे प्रमुख म्हणून पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, वाहतूक विभागाचे अधिकारी त्याचबरोबर सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बेल्हा – जेजुरी मार्गाचे शिक्रापूर ते पाबळ या भागातील रस्त्याचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या भागात धोकादायक ठिकाण आणि अपघात प्रवणक्षेत्र आहेत ती शोधून पुढील कार्यवाही करणार असल्याचे या बैठकीत ठरले.
गेल्या आठवड्यात जांभळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. या बेल्हा – जेजुरी मार्गावर झालेल्या अपघातांचा लेखाजोखा मांडला होता. स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असलेल्या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती. संबंधित अधिकारी या बाबीची दखल घेणार नसतील तर परिसरातील मुखई, धामारी, जातेगाव, पाबळ येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत धामारी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी बैठक घेऊन सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात मिलाप घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Add Comment