मतदार संघातील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी.
तळेगाव ढमढेरे, पुणे | राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या तळेगाव ढमढेरे येथील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले की, “मानेला दुखापत झाल्याने आजच्या कार्यक्रमाला येईल की नाही हा संभ्रम होता. जर उपस्थित नसतो राहिलो तर बातम्या सुरू झाल्या असत्या की, “डॉ. अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय तरी काय ? मतदार संघातील कार्यक्रमाकडे फिरवली पाठ” !. यावर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. पुन्हा गंभीर होत डॉ. कोल्हे यांनी एक सूचक विधान केले की, “शेतकऱ्यांचं पोर आहे उगाच औत खांद्यावर घेऊन फिरायची गरज नसते, वारा आणि आभाळ पाहून शेत नांगरायला घ्यायचं असतं. पाच वर्षांची जी जबाबदारी आहे ती आधी पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे” त्यामुळे किमान निवडणुकीपर्यंत तरी पक्ष सोडणार नसल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान मतदार संघात खासदार वेळ देत नसल्याच्या चर्चा राष्ट्रवादीचे नेते सातत्याने पक्षांतर्गत करत असतात त्याला प्रतिउत्तर म्हणून की काय ? डॉ. कोल्हे म्हणाले की, आधीच सहसा कल्पना दिली तर खासदार कार्यक्रम चुकवत नाहीत असा टोला पक्षातीलच नेत्यांना डॉ. कोल्हे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रस्तापितांचा पक्ष म्हणून सातत्याने विरोधक टीका करत असतात. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून स्वतः ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणवून घेत असतात मात्र या सगळ्या गोष्टींना छेद देणारे विधान राष्ट्रवादीचेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. “नुसतं व्यासपीठावर फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून चालणार नाही. जोपर्यंत प्रस्तापितांना प्रश्न विचारला जात नाही तोपर्यंत हा पुरोगामी विचार रुजवला जाणार नाही” असे पक्षाचेच कान टोचणारे वक्तव्य खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले “प्रस्थापित असलेल्या विचारला प्रश्न विचारला पाहिजे, जर प्रश्न विचारला नाही तर अंधभक्तांच्या टोळ्या तयार होतात, अंधभक्तांच्या फौजा तयार होतात. अंधभक्त हे ठराविक पक्षापुरते नसतात, ठराविक एका नेत्यापुरते नसतात अंधभक्त हे सगळीकडे असतात. जेव्हा आपण प्रश्न विचारायचे थांबतो तेव्हा अंधभक्त तयार होतात. हा प्रश्न विचारणे म्हणजे पुरोगामी विचार जागवणे. त्याचबरोबर माझ्या हक्कासाठी भांडलं पाहिजे, माझ्यात काय ताकद आहे हे सातत्याने मांडलं पाहिजे, मांडून आणि भांडून माझ्या पदरात काही मिळत नसेल तर मला जाणीव करून दिली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार मनामनात रुजवला पाहिजे” दरम्यान या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील अंधभक्त तयार होत आहेत का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ओबीसी आरक्षणावर बोलताना, आरक्षणापेक्षा शिक्षणाला महत्त्व देण्याची गरज यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अधोरेखित केले ते म्हणाले की, “जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, एखाद्या वधू वर सूचक मंडळाच्या मेळाव्याला न बोलावता मला करिअर गाईडन्ससाठी बोलवा, स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी बोलवा ते आलं तर कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आरक्षणाची गंगा ती आडवी न पसरता ती उभी जाईल आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल”.
दरम्यान या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment