शिरूर, पुणे | शिरुर तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणुकीचे काल (दि.१८) मतदान पार पडले. यामध्ये मांडवगण फराटा, करंजावणे, सोनेसांगवी आणि काठापुर यांचा समावेश आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मांडवगण फराटा येथे रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावर गर्दी होती रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. तर सोनेसांगवीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला. करंजावणे आणि काठापुर या दोन्ही गावामध्ये शांततेत मतदान पार पडले.
सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मांडवगण फराटा ही शिरुर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत मानली जाते. या गावात थेट जनतेतून सरपंच पद मिळविण्यासाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे यांच्या सून समिक्षा अक्षय फराटे या निवडणूकीच्या रिंगणात आहे तर समोर शीतल सचिन जगताप या उमेदवार आहेत. दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल तर मदन फराटे, दादासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे यांसह अनेकांनी मिळून एका पॅनेलचे नेतृत्व केले. यापूर्वी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत देखील दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांनी एकत्र येत सोसायटीच्या निवडणुकीत यश मिळवले आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
त्याचबरोबर सोनेसांगवी ग्रामपंचायतच्या निवडणुकीतही अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सलग वीस वर्षे सत्ताधारी असलेले दत्तात्रय कदम यांच्या पत्नी अलका दत्तात्रय कदम पुन्हा सरपंच पदाच्या रिंगणात आहेत. तर कदम यांचे एकेकाळचे सहकारी असलेले मल्हारी काळे यांच्या पत्नी रेखा मल्हारी काळे या सरपंच पदाच्या रिंगणात आहेत. शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांचे निकटवर्तीय असलेले दत्तात्रय कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेल आहे तर मल्हारी काळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील युवकांना एकत्र करून सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत दत्तात्रय कदम यांच्या पाठोपाठ मानसिंग पाचूंदकर यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
करंजावणेमध्ये सरपंच पदासाठी मंगल संतोष दौंडकर, आरती, शांतीदेव शिंदे, सुमित्रा संपत दौंडकर हे उमेदवार आमनेसामने असणार आहे तर काठापुर ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी देखील सीमा बिपीन थिटे आणि कांताबाई यशवंत दिघे यांच्यात लढत होत आहे. दरम्यान या चारही ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. उद्या (दि. २०) रोजी मतमोजणी पूर्ण होईल आणि मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे स्पष्ट होईल
Add Comment